दारू पिला एक, सस्पेंड झाले चार, त्यात एक माळकरी!

डीकेनगर चौकीत पोलिसांच्या दारू पार्टीने चार पोलिस निलंबित
Gangapur Police Chowki
Gangapur Police ChowkiSarkarnama

नाशिक : शहरातील (Nashik) डीकेनगर पोलिस चौकीत तक्रारीसाठी गेलेल्या नागिरकाला पोलिस दारू पित असल्याचे दिसले. त्याने पोलिसांना (Police) कळवले. गोंधळ झाला. गर्दी झाली. त्याची बातमी आली. त्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी चार पोलिस निलंबीत केले. यथावकाश सत्य बाहेर आले. दारू पिला एक. निलंबीत झाले चार. त्यात एक आयुष्यात कधीही दारुला स्पर्श न केलेला वारकरी.

Gangapur Police Chowki
आयुक्त पांडे संतापले, चौकीत दारु पिणारे ४ पोलिस सस्पेंड!

ही घटना नाशिक शहरात गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. येथे ड्यूटी संपल्यानंतर बंद असलेल्या डीकेनगर पोलिस चौकीतच चार पोलिस बसले होते. त्यातील एक दारु पीत होता. यावेळी तक्रार देण्यास गेलेल्या नागरिकाला हा प्रकार लक्षात आला.

Gangapur Police Chowki
बैठक नागरिकांची; नगरसेवकांची गाऱ्हानी होर्डींगवर झळकण्याची!

स्थानिक नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आल्यावर नागरिकांनी गर्दी केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष किशोर शिरसाठ यांनी नागरिकांना शांत करीत सर्व माहिती घेतली. वरिष्ठांना हा प्रकार कळवला. पोलिसांना बोलावून घेतल्यानंतर पार्टीकर्त्यांची पळापळ झाली. मयूर सिंग, रघुनाथ ठाकूर, सागर बोधले आणि सुरेश जाधव असे हे चार पोलिस होते. हा प्रकार घडला तेव्हा नागरिकांचा पारा चढलेला होता. गर्दीची मानसिकता झळकत होती. त्यामुळे पोलिस उपायुक्त खन्ना यांनीही हा प्रकार गांभिर्याने घेतला.

या पोलिसांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही. पोलिस आयुक्त दीपक पांडे यांना माहिती देण्यात आली. रात्री नऊला ड्यूटी संपल्यानंतर या बीट मार्शलांनी गणवेशासह पोलिस चौकीत पार्टी करीत असल्याचा व्हिडिओ स्थानिक नागरिकांनी शूट करून व्हायरल केला होता. त्यामुळे दबावातून निलंबणाची घोषणा झाली. तेव्हा नागरिकांत वेगळी चर्चा सुरु झाली. या चार पैकी केवळ एकच मद्यपान करीत होता. उर्वरीत तीघे बसलेले होते. मात्र चौघांवरही कारवाई झाली. त्यात एक वारकरी व तुळशीची माळ घातलेला नाही. तो दारूला स्पर्शही करीत नाही. मात्र निलंबीत झाला आहे, दारू पितो या आरोपावरून. त्यामुळे नाशिकचे हे प्रकरण चांगलेच चर्चेचा विषय ठरले.

काय आहे मुळ प्रकरण

डीकेनगर पोलिस चौकीलगत महापालिकेच्या उद्यानात दारूच्या पार्ट्यांतील तर्रर टवाळखोरांचा त्रास असताना रात्री दहाच्या सुमारास शांतीनिकेतन भागातील बाळासाहेब शिंदे तक्रार देण्यासाठी चौकीत गेले होते. त्या वेळी शिपाई मयूर सिंग यांसह तेथील पोलिसांनी शूटिंग करतो का, असे म्हणत शिंदे यांनाच चौकीत घेऊन, लाइट बंद करून मारहाण केल्याचे श्री. शिंदे यांनी ‘सकाळ’ला सांगितले.

राजकीय पक्षांनी भाजली पोळी

रस्त्यावर आंदोलन करणाऱ्यांवर पोलिस आयुक्त दीपक पांडे हे थेट गुन्हे दाखल करीत असल्याने अगोदरच नाराज असलेल्या भाजप पदाधिकाऱ्यांनी हा विषय ताणून धरला आहे. पोलिसांनी अंबडला गुन्हा दाखल केलेल्या भाजप आमदार सीमा हिरे यांनी हा विषय थेट विधिमंडळात उपस्थित करण्याचा इशारा दिला आहे. पोलिसांविरोधात रोष असलेल्या राजकीय मंडळींनी ही संधी मानून पोलिस आयुक्तांविरुद्ध वातावरणनिर्मिती सुरू केली आहे. त्यामुळे राजकीय पातळीवर हा विषय रंगण्याची चिन्हे आहेत.

चौकशीनंतर निलंबन

सहाय्यक आयुक्त दीपाली खन्ना यांनी या घटनेची चौकशी करीत पोलिस आयुक्त दीपक पांडे यांना अहवाल दिल्यानंतर चौघांना निलंबित करण्यात आले असून, विभागीय चौकशीचे आदेश दिले. यानिमित्ताने शहरातील तात्पुरत्या परवानग्या घेऊन सुरू असलेल्या पोलिस चौक्यांची माहिती घेतली जाणार असल्याचे श्री. पांडे यांनी स्पष्ट केले.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com