Ahmednagar News : उसाचा दर साखर कारखान्यांनी जाहीर करावा, या मुख्य मागणीसाठी शेतकऱ्यांच्या विविध संघटना नगर जिल्ह्यात आक्रमक झाल्या आहेत. काही ठिकाणी आंदोलनाला सुरूवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या विविध संघटनेच्या प्रमुखांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली.
या बैठकीत उसाचा दर निश्चित झाला नसला तरीही दोन दिवसांमध्ये एफआरपी जाहीर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले.
जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील पंडित नेहरू सभागृहात शेतकरी संघटना, ऊस वाहतूकदार आदी संघटनेच्या नेत्यांची बैठक झाली. प्रादेशिक साखर सहसंचालक प्रवीण लोखंडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब लवांडे, शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विठ्ठल पवार राजे, ‘प्रहार’चे जिल्हा अध्यक्ष अभिजित पोटे, बाळासाहेब फटांगरे, सुरेश भोसले, बाळासाहेब करंजुले, सुरेश ताके आदी याप्रसंगी उपस्थित होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
यावेळी अभिजित पोटे यांनी सांगितले की, उसाचा दर साखर कारखान्यांनी निश्चित केलेला नसल्याने शेतकऱ्यांनी कोणत्या कारखान्याला ऊस द्यावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. रात्री-अपरात्री जागून शेतकऱ्यांनी उसाला पाणी दिलेले आहे. तसेच वाहतूक करणाऱ्या वाहनांचा दर वाढविण्याची मागणीही केली. तर स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब लवांडे यांनी ऊस वाहतूक करणाऱ्या काही वाहनांना विमा नसतो. अशा परिस्थितीमध्ये अपघात झाल्यास भरपाईचा प्रश्न निर्माण होतो. कारखान्याने विमा काढावा, अशी मागणी केली.
याशिवाय, बाळासाहेब करंजुले यांनी इंधन दरवाढीमुळे वाहतुकीचा खर्च वाढला आहे. कारखान्यांनी वाहतुकीचा दर इंधनाच्या प्रमाणात वाढविण्याकडे लक्ष वेधले. या बैठकीत उसाचा दर निश्चित झाला नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी दोन दिवसांमध्ये एफआरपी कारखान्यांनी जाहीर करावी, असे निर्देश दिले आहेत.
दरम्यान, प्रादेशिक साखर सहसंचालक प्रवीण लोखंडे यांनी साखर कारखानदार, शेतकरी संघटना व ऊस उत्पादक शेतकरी यांची ही संयुक्त बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये शेतकरी संघटनेने गेली दोन महिने साखर प्रशासन व साखर कारखानदार यांच्याकडे चालू गळीत हंगामातील उसाचा दर जाहीर करावा, या मागणीसाठी वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा केला.
परंतु, शेतकरी संघटनांच्या मागणीला शेवगाव तालुक्यातील तसेच परिसरातील साखर कारखानदारांनी कोणत्याही प्रकारची दाद दिली नाही. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शेवगाव- पैठण रोडवर घोटण येथे उस वाहतूक थांबविली होती. उसाचा दर जाहीर करावा, अशी मागणी केली.
त्यावर तालुक्यातील तसेच परिसरातील कारखान्यांनी 2 हजार 700 रूपये उसाचा पहिला हप्ता देण्यात येईल, असे जाहीर केले. हा दर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना मान्य नसल्याने त्यांनी 3 हजार 100 रुपये प्रति टन भाव द्यावा.
अन्यथा, ऊस तोडणी तसेच वाहतूक होऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यामुळे शेवगाव तालुक्यातील घोटण येथील वाहतूक सुरळीत करण्यासाठी शेवगाव तहसीलदार प्रशांत सांगडे, पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मध्यस्थीने शेवगाव तहसील कार्यालयात प्रांताधिकारी प्रसाद मते यांच्या अध्यक्षतेखाली ऊस दराबाबत बैठक झाली होती.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.