Sinhasth Kumbhmela News: सिंहस्थ कुंभमेळा हा प्रशासन आणि राजकीय नेत्यांमध्ये वर्चस्ववादाचा विषय होतो की काय अशी स्थिती आहे. त्र्यंबकेश्वर येथे मंत्री गिरीश महाजन यांच्या दौऱ्यात नागरिकांनी नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रारीचा पाढा वाचला. तक्रारी उत्स्फूर्त की राजकीय प्रेरणेतून झाल्या यावर चर्चा सुरू आहे.
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी नुकताच त्र्यंबकेश्वरचा दौरा केला. हा दौरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी होता. त्यामुळे सिंहस्थ कुंभमेळ्याची चर्चा यावेळी झाली.
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा दौरा सुरू असताना शहरात नागरिकांनी अतिक्रमण विभागाकडून त्रास दिला जातो अशी तक्रार केली. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या कामकाजामुळे नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागते. शहरात केलेले वृक्षारोपण दिसत नाही अशा स्वरूपाच्या तक्रारी होत्या. या तक्रारीनंतर प्रभारी मुख्याधिकारी श्रेया देवचक्के यांची चौकशी सुरू झाली.
मंत्री महाजन यांचा दौरा आणि त्यानंतर सुरू झालेली मुख्याधिकाऱ्यांची चौकशी याचा संबंध आहे की नाही हा वादाचा विषय आहे. मात्र या निमित्ताने काही स्थानिक नेत्यांकडून नगरपालिकेच्या निविदा आणि विकासकामांबाबत दबाव टाकण्यात येत असल्याचे बोलले जाते. अधिकाऱ्यांनी त्याला प्रतिसाद न दिल्यानेच ही चौकशी सुरू झाल्याची चर्चा सुरू झाली.
सिंहस्थ कुंभमेळ्यात अधिकारी आणि राजकीय नेते तसेच धार्मिक संस्था, साधू आणि प्रशासन यांच्यात वाद होतोच. हा वाद मात्र त्यात बसणारा नाही. सिंहस्थासाठी २७५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्र्यंबकेश्वरसाठी सिंहस्थ कुंभमेळ्याचा आराखडा श्रीमती देवचक्के यांनीच केला आहे.
या पार्श्वभूमीवर माजी नगराध्यक्ष आणि त्र्यंबकेश्वर देवस्थानचे विश्वस्त कैलास घुले यांनी आपल्या किंवा राजकीय नेत्यांचा या वादाशी काहीही संबंध नाही. नागरिकांच्या १७ तक्रारी शासनाला प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसारच प्रोबेशनरी आयएएस अधिकारी ओंकार पवार यांनी ही चौकशी सुरू केली आहे. त्यात सत्य ते काय हे बाहेर येईल, असा दावा केला.
त्र्यंबकेश्वर नगरपालिकेच्या प्रभारी मुख्याधिकारी श्रेया देवचक्की यांनी मात्र आपल्या विरोधातील तक्रारी निराधार असल्याचे म्हटले आहे. आपले काम अत्यंत पारदर्शी आहे. कोणतेही काम नियमबाह्य झालेले नाही शासनाचे सर्व निकष पाडूनच विकास कामे झाली. नगरपालिकेचे उत्पन्न चार कोटींनी वाढले आहे. महिला अधिकारी असल्याने आणि सिंहस्थाचा हितसंबंध डोळ्यापुढे ठेवून काही मंडळी आपल्या विरोधात निराधार तक्रारी करीत आहेत, असा दावा केला.
या निमित्ताने संस्थाची सध्याची २० कोटी रुपयांची कामे सुरू आहेत. या कामांमध्ये काही राजकीय नेत्यांना रस आहे. मात्र तो हेतू साध्य न झाल्याने त्यांच्याकडून सोयीचा अधिकारी नियुक्त व्हावा, असे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्याचा एक भाग म्हणूनच ही चौकशी असल्याचे सांगितले जाते. सिंहस्थ कुंभमेळ्या आधीच प्रशासन आणि राजकीय नेते यांच्यातील हा वाद त्यामुळेच चर्चेचा विषय ठरला आहे.
-----
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.