पानटपरी चालविणारे गुलाबराव तिसऱ्यांदा झाले मंत्री!

कट्टर शिवसैनिक असलेल्या गुलाबरावांना बंडखोरीनंतरही एकनाथ शिंदे यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची संधी दिली आहे.
Gulabrao Patil
Gulabrao Patil Sarkarnama
Published on
Updated on

जळगाव : एकेकाळी पानटपरी चालवून उदरनिर्वाह करणारे गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) तिसऱ्यांदा मंत्री झाले आहेत. कट्टर शिवसैनिक असलेल्या गुलाबरावांना बंडखोरीनंतरही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची संधी दिली आहे. (Gulabrao Patil of Jalgaon became the minister for the third time)

जळगाव जिल्ह्यातील पाळधी या लहानश्‍या खेड्यात गुलाबराव पाटील यांनी राजकीय कारकिर्दीस सुरुवात केली. अगदी सर्वसामान्य घरातील गुलाबराव पाटील यांचे शिक्षण जेमतेम दहावीपर्यंत झाले आहे. चरितार्थासाठी त्यांनी पाळधी येथे पानटपरी सुरू केली, त्यावेळी अमिताभ बच्चन यांचा ‘नसीब’ चित्रपट जोरात सुरू होता. त्यावरून त्यांनी आपल्या पानटपरीला ‘नसीब पान स्टॉल’असे नाव दिले होते.

Gulabrao Patil
अब्दुल सत्तार, संजय राठोड आक्रमक होताच शिंदे नरमले; कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी

शिवसेना १९८६ च्या काळात मुंबईबाहेर पडून राज्याच्या ग्रामीण भागात आपला विस्तार वाढवित होती. ग्रामीण भागातील अगदीच त्यावेळच्या भाषेत ‘टपोरी’ असलेली मुले शिवसेनेकडे वळली होती. मुंबईतील शिवसैनिकांचे ‘दे धडक’ कार्यक्रम ग्रामीण भागातील शिवसैनिकाला भूरळ पाडणारे ठरले. तसेच, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रेरणाही त्यांना महत्वाची होती. त्यातूनच गुलाबराव पाटील हे शिवसेनेकडे वळले. त्यांनी शिवसेनेच्या आंदोलनात सहभाग घेण्यास प्रारंभ केला. त्यांची टपरी हे शिवसैनिकांना भेटण्याचे ठिकाण होते.

Gulabrao Patil
एकनाथ शिंदेंनी सह्याद्रीवरील त्या बैठकीत आमदारांना दिले हे आश्वासन!

वीजप्रश्न, शेतकऱ्यांच्या समस्या, जिल्हा रुग्णालयात रूग्णांना सेवा मिळत नसल्याच्या तक्रारींवर त्यांनी आंदोलन सुरू केले. त्यांचे आंदोलन म्हणजे थेट ‘दे दणादण’ असेच होते. तसेच, त्यांच्याकडे ग्रामीण भाषाशैलीतील वक्तृत्व होते. त्यातून त्यांनी शिवसेनेत आपली छाप पाडली. ते पाळधीचे सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य आणि मग पुढे आमदार झाले. मात्र, मंत्रिपदासाठी त्यांना २०१४ ची वाट पहावी लागली. ते प्रथम राज्याच्या युती सरकारमध्ये सहकार राज्यमंत्री झाले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात त्यांना बढती मिळाली, ते कॅबिनेट मंत्री झाले.

Gulabrao Patil
ऐनवेळी पत्ता कट झालेले शिरसाट म्हणाले, ‘मंत्रिपद मिळालं नाही; म्हणून एकनाथ शिंदेंना सोडून...’

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडात गुलाबराव पाटीलसुद्धा सामील झाले. या ठिकाणीही त्यांनी विधिमंडळात शिंदे सरकारच्या बंडाची बाजू योग्य कशी असे सांगून आपल्या आक्रमक वक्तृत्वशैलीचा ठसा उमटविला होता. शिंदे यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी मंगळवारी (ता. ९ ऑगस्ट) कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com