

Hindutva Issue Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे पुन्हा एकदा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्यावर बरसल्या. विधानसभा निवडणुकीनंतर हिंदुत्वाच्या मुद्या
हाती घेऊन संग्राम जगताप महाराष्ट्रभर मोर्चा, आंदोलनांमध्ये हजेरी लावत आहेत. यावर सुप्रिया सुळे यांनी थेट हल्ला चढवला.
"यांचं काय कर्तृत्व आहे, हे आमच्या मतदारसंघात येऊन भाषण करतात. माझ्या मतदारसंघात येऊन, अशी भडकावू भाषणे केली ना, आता गाठ माझ्याशी आहे. माझं मतदारसंघ जिथे सुरू होतो ना, त्याच ठिकाणीच मी आता आडवी उभी राहणार आहे. बघतोस कसा येतो ते, नही चलेगा ये सब," असा शब्दात सुप्रिया सुळे यांनी ठणकावलं आहे.
सुप्रिया सुळे संगमनेर (Sangamner) तालुक्यातील सावरगाव घुले गावाच्या दौऱ्यावर होत्या. त्यावेळी त्यांनी सरकारच्या तिजोरीत खडखडाट झाला आहे. शेती, महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराचे मुद्दे वाढल्याने, सरकारच्या आर्थिक परिस्थिती इतकी गंभीर आहे की, सरकारकडे पैसे नाही. हे असंच राहिले तर काही महिन्यांनी सरकारकडे पगार करायल सुद्धा पैसे राहणार नाही, असे सांगत असताना सरकारबरोबर वैचारिक लढाई सुरू आहे अन् ती सुरूच राहणार, असल्याचा इशारा दिला.
सुप्रिया सुळे यांनी अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांचे नाव न घेता जोरदार हल्ला चढवला. मध्यंतरी आमच्याकडे आले होते. जोरजोरात भाषण करून गेले. भडकावू भाषण केले. लोकांमध्ये भांडण लावणारी भडकावू भाषा आपण सहन करणार नाही. नगर मधले जनतेने ही, अशी भाषण सहन केलेली नाहीत. कारण, महाराष्ट्र आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. फुले-शाहू-आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे, असे ठणकावून सुळे यांनी सांगितले.
''दिवाळीत हिंदू लोकांकडूनच दिवाळीचं सामान घ्या', असे म्हटले होते ना, त्यांना तीनच प्रश्न करते, असे सांगून, टाटा कुटुंब हे कुठल्या समाजाचं, पारशी होते. त्यांचं मीठ, साखर, गाडी, रस्ता चालतो, पार्लमेंटची संपूर्ण इमारत टाटांनी बांधली आहे, हे चालतं, मग त्यांच्याकडून घ्यायचं का नाही सामान? कोविडमध्ये लसीकरण झालं, ती लस कोणी तयार केली? सिरमने! त्याच्या मालकाचे नाव काय? साइरस पुनावाला, तो देखील पारशी आहे. मग लस घ्यायची का नाही? सिपला कंपनीचा मालकाचे नाव काय आहे, तर युसूफ हमीद, दिवाळी चार दिवस सिपलाच्या गोळ्या घेतल्या नाही का कोणी?,' असे प्रश्न सुप्रिया सुळे यांनी केले.
'हा विचारच बुरसटलेला आहे. त्यांना वाटत असून हे चालणार आहे. पण पुरोगामी महाराष्ट्र असली भाषण खपवून घेणार नाही. मी तर खपूनच घेणार नाही. माझ्या मतदारसंघात एकदा आले. मी जाहीरपणे सांगते, लगेच भाजपचे आमदार राहुल कुल यांना, मी फोन केला, हा बाबा आपल्या मतदारसंघात येतोय, इथं आताच दगडफेक झालेली आहे, याला आत्ताच आवर. राहुल कुल यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला, आपल्या मतदारसंघाचा नुकसान होणार नाही, त्यासाठी आपण एक राहू,' असे म्हणत मला आश्वस्त केल्याचा किस्सा सुप्रिया सुळे यांनी सांगितला.
'यांचं काय कर्तृत्व आहे, हे आमच्या मतदारसंघात येऊन भाषण करणार. माझ्या मतदारसंघात येऊन, अशी भडकावू भाषणे केली ना, गाठ माझ्याशी आहे. माझं मतदारसंघ जिथे सुरू होतो ना, आता त्याच ठिकाणीच मी आडवी उभी राहणार आहे. बघतोस कसा येतो ते, नही चलेगा ये सब,' असा इशारा सुप्रिया सुळे यांनी दिला.
'आम्हाला अभिमान आहे, आम्ही भारतीय असल्याचा. 'सारे जहाँ से अच्छा हिन्दोस्ताँ हमारा', असे असताना मग आम्हाला जाती-जतीमध्ये का अडकवता? शेतकऱ्यांच्या अश्रू का दिसत नाहीत, त्याच्यावर का भाषण करत नाही? एक 32 वर्षाचा कॉन्ट्रॅक्टरने आत्महत्या केली, त्याच्या घरी का गेला नाहीत? आत्महत्या केलेल्या शिक्षकाच्या घरी गेलेले हे लोक कधी बघितलेत का?
शेतकऱ्यांच्या पिकासाठी भाव मिळावी यासाठी यांनी आंदोलन केलं आहे का? असली भाषण करून, तुम्ही फक्त जातीय तेढ निर्माण करता, आपल्या भारताचे नुकसान करता, हे कुठेतरी आपण थांबवलं पाहिजे आणि यासाठी आपण पण कुठे ना कुठेतरी बोललं पाहिजे, मी नेहमीच बोलते आणि बोलत राहणार,' असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले.
'मला विश्वास आहे की, 2029ला असल्या लोकांना हीच मायबाप जनता घरी पाठवली, पंडित जवाहरलाल नेहरूंनी 'The Discovery of India' हे पुस्तक इथंच लिहिलं, अहिल्यानगरमध्ये तुरुंगात असताना लिहिलेलं हे पुस्तक संपूर्ण जग आज वाचतं आहे, असे सांगून, एक बरं झालं त्यांना त्यांच्या पक्षाने नोटीस पाठवली आहे, पुढे काय होईल हे मला माहित नाही.
पण पक्षाने त्यांना आवरलं पाहिजे, पक्षातून काढून टाका, कधीतरी आयुष्यात स्ट्राँग डिसीजन घेतले गेलेच पाहिजे, कारण की ते राज्याचे हिताचे असतात,' असे म्हणताना सुप्रिया सुळेंनी पुन्हा एकदा अजितदादांचे निर्णयाकडे लक्ष वेधले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.