
Nashik Political News : विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याने पक्षातील नेते आक्रमक झाले आहेत. त्यामुळे राज्यातील पाच आमदार पक्षाच्या रडारवर आहे. त्या आमदारांच्या पक्षनिष्ठेविषयी नेत्यांना संशय आहे.
क्रॉस व्होटिंगचा आरोप असलेले इगतपुरीचे आमदार खोसकर हे पुन्हा वादात सापडले आहे. त्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यामुळे खोसकर यांच्या भूमिकेविषयी संशय व्यक्त करण्यात आला होता. याबाबत त्यांनी खुलासा केला आहे.
आपण काँग्रेससोबतच आहोत. मतदारसंघातील साडेतीनशे अतिक्रमणांचा विषय मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. दुसरी काहीही कारण नाही, असे स्पष्टीकरण आमदार हिरामण खोसकर Hiraman Khoskar यांनी दिले आहे. त्यामुळे त्यांच्या भोवती निर्माण झालेले संशयाचे वातावरण निवळणार का, याकडे लक्ष आहे.
विधान परिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंग झाले. यामध्ये काँग्रेस पक्षाची आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे आमदारांवर नियंत्रण राहिले नाही, अशी टीका झाली होती. त्यामुळे या नेत्यांनी हा विषय अतिशय गांभीर्याने घेतला आहे.
यापूर्वी ठराविक आमदारांनी चंद्रकांत हांडोरे यांच्या निवडणुकीतही दगाफटका केला होता. त्यामुळे काँग्रेस उमेदवार हंडोरे यांचा अवमानकारक पराभव झाला होता. ती मालिका नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीतही कायम राहिल्याचे दिसून आली.
काँग्रेसच्या सात आमदारांनी क्रॉस व्होटिंग केले. त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचा पराभव झाला. याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला झाला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी Ajit Pawar त्याची जाहीर वाच्यताही केल्याने हा विषय चिघळला.
विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर आमदार खोसकर प्रचंड तणावात आहेत. त्यातच त्यांनी शिंदे गटाचे पालकमंत्री दादा भुसे यांचीही भेट घेतली होती. त्यामुळे देखील त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. आज या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर ते पुन्हा मुख्यमंत्र्यांना Eknath Shinde भेटले. त्यामुळे नवा वाद निर्माण होणे स्वाभाविक आहे.
याबाबत ते म्हणाले, त्र्यंबक रस्त्याला साडेतीनशे नागरिकांची विविध दुकाने आहेत. ती रस्त्यालगत नाही. असे असताना प्रशासन ते पाडण्यासाठी जिद्दीला पेटले आहे. मतदारसंघातील हे लोक अतिशय गरजू आणि गरीब आहेत.
त्यामुळे ही अतिक्रमणे पाडू नये, यासाठी पाठपुरावा करीत आहे. मात्र मुजोर अधिकारी दाद देत नाहीत. या अतिक्रमण केलेल्या लोकांनी रस्त्यावर बसून भीक मागायची का? असा उद्विग्न प्रश्नही त्यांनी केला. त्यांच्यामागे उभे राहणे हे कर्तव्य असल्याचेही खोसकर म्हणाले.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.