

Nashik News : राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मतदारसंघातच कोट्यवधी रुपयांचा प्रतिबंधित तंबाखू तयार करणारा कारखाना आढळल्याने खळबळ उडाली आहे. राज्यात बंदी असलेला सुगंधित तंबाखू, पानमसाला, गुटखा, जर्दा, सिगारेट्स आणि तत्सम पदार्थांचे तळेगाव (ता. दिंडोरी) येथील एका कारखान्यात बिनधास्तपणे उत्पादन सुरू होते. नाशिक अन्न व औषध प्रशासनाच्या भरारी पथकाने धाडसी कारवाई करत या कारखान्यावर छापा टाकला असून तब्बल ९ कोटी ६ लाख २५ हजार ४२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची पोलिसांना आधी काहीच माहिती नव्हती का? होती तर मग या कारखान्याला कुणाचं संरक्षण होतं असा सवाल उपस्थित केला जात आहे.
या प्रकरणी कंपनीचे संचालक विपीन शर्मा, ॲडव्हर्ट मिचेल बोरगोईन, सुसंतकुमार पांडा, व्यंकट रमेश पेनुमाक, दयानंद रे तसेच आस्थापना मे. इलाईट क्राउन इंटरनॅशनल लिमिटेड यांच्याविरोधात दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागरिकांच्या आरोग्यास गंभीर धोका पोहोचवणाऱ्या या पदार्थांच्या निर्मितीला आळा घालण्यासाठी संबंधित कारखान्याची इमारत आणि वापरातील यंत्रसामग्री प्रशासनाने तात्काळ सील केली आहे.
हा परिसर राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मतदारसंघात येत असल्याने, इतक्या मोठ्या प्रमाणावर सुरू असलेला अवैध उद्योग कोणाच्याही नजरेत कसा पडला नाही? याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गुटखाबंदी आणि मकोका कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी आग्रही असलेले मंत्री झिरवाळ यांच्या कार्यक्षेत्रातच काही प्रशासकीय अधिकारी किंवा पोलीस यंत्रणेच्या आशीर्वादाने हा कारखाना सुरू होता का, असा संशय व्यक्त होत आहे.
या संपूर्ण प्रकरणाची एसआयटीमार्फत सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लक्ष घालावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
तळेगाव येथील गट क्रमांक ३५२/२ येथे मे. इलाईट क्राउन इंटरनॅशनल लिमिटेड ही कंपनी कार्यरत असून, तेथे बंदी घालण्यात आलेल्या पदार्थांचा साठा बेकायदेशीररीत्या केला जात असल्याची माहिती नाशिकच्या अन्न व औषध प्रशासन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पुढील कारवाईसाठी हालचाली सुरू करण्यात आल्या.
दरम्यान, अन्न सुरक्षा अधिकारी उमेश सूर्यवंशी, जी. व्ही. कासार आणि जी. एम. गायकवाड यांनी यापूर्वीही ग्लोबल टोबॅको एजन्सी (गट क्रमांक ५२७/५/३, सम्राट पीपीयू इंडस्ट्रीज, इगतपुरी) येथे छापा टाकला होता. त्या ठिकाणीही अशाच स्वरूपाचा प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा साठा आढळून आला होता. (Nashik News)
या कारवाईदरम्यान ‘सबा प्रीमियम प्रीमिक्स ऑफ शिसा’ या प्रतिबंधित पदार्थाच्या पॅकेजिंगवर मे. इलाईट क्राउन इंटरनॅशनल लिमिटेड, गट क्रमांक ३५२/२, मौजे तळेगाव, दिंडोरी असा पत्ता आढळून आला. या माहितीच्या आधारे भरारी पथकाने थेट तळेगाव येथील संबंधित कंपनीत जाऊन तपास सुरू केला.
तेथे पाहणी करताना सिगारेट्सच्या निर्मितीचे काम सुरू असल्याचे आढळले. तपास अधिक खोलात गेल्यावर तंबाखूला नैसर्गिक सुगंध नसल्याचे स्पष्ट झाले. त्याऐवजी टोबॅको रिफाइंड ग्लिसरीन, इंडस्ट्रियल परफ्यूम, मसाला कंपाउंड आणि रिफाइंड सोयाबीन या रसायनांच्या मिश्रणातून सुगंधित तंबाखू तयार केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.