

Maharashtra Renaming Controversy : अहमदनगर जिल्ह्याचे अहिल्यानगर आणि औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, असे नामांतर झाल्यानंतर राज्यात विविध ठिकाणांची नावे बदलण्याच्या मागण्यांना वेग आला आहे.
आता या वादात आणखी एका महत्त्वाच्या ठिकाणाची भर पडली असून, अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील इमामपूर घाटाचे नाव बदलून ‘ज्ञानेश्वरी घाट’ करण्यात यावे, अशी जोरदार मागणी पुढे येऊ लागली आहे.
नेवाशाच्या संत ज्ञानेश्वर संस्थानच्या पुढाकारातून देहू-आळंदीच्या धर्तीवर ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पालखी सोहळा पुढील आठवड्यात पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. याच पार्श्वभूमीवर इमामपूर घाटाच्या नामांतराचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे, या पालखी सोहळ्याला अवघ्या दुसऱ्याच वर्षी राज्य सरकारने (Maharashtra Government) मानाच्या दिंडीमध्ये स्थान दिले, त्यामुळे आता नामांतराची मागणी प्रशासनापर्यंत पोहोचते का? याकडे लक्ष लागले आहे.
गेल्या वर्षी गंगापूर येथील श्री विठ्ठल आश्रमचे प्रमुख रामभाऊ महाराज राऊत यांच्या संकल्पनेतून आणि आखेगाव येथील सद्गुरु श्री जोग संस्थानच्या सहकार्याने हा पालखी सोहळा (Pandharpur Wari) सुरू झाला होता. त्यावेळी वेदांताचार्य देविदास महाराज म्हस्के यांनी पांढरीपूल येथे मुक्कामादरम्यान इमामपूर घाटाला ‘ज्ञानेश्वरी घाट’ नाव देण्याची इच्छा व्यक्त केली होती. या मागणीला मोठा प्रतिसाद मिळाला; मात्र त्यानंतर विषय पुढे सरकला नाही.
दरम्यान घाट परिसरातील पांढरीपूल, वांजोळी, खोसपुरी, गुंजाळे आणि इमामपूर येथील ग्रामस्थ, भाविक आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनी या मागणीला पाठिंबा दर्शवला आहे. सामाजिक कार्यकर्ते अदिनाथ काळे यांनी सांगितले की, नेवासे तालुक्यातच संत ज्ञानेश्वर महाराजांच्या हस्ते ‘ज्ञानेश्वरी’ या अलौकिक ग्रंथाची निर्मिती झाली, ही संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. यासाठी ग्रामपंचायतींचे ठराव घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवला जाणार आहे. तसेच पांढरीपूल येथील व्यावसायिक बद्रिनाथ खंडागळे यांनी सांगितले की, यंदा ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पालखीचे जोरदार स्वागत करण्यात येणार आहे.
यासंदर्भात संत ज्ञानेश्वर संस्थानचे देविदास म्हस्के म्हणाले की, मागील वर्षी नामांतराचा प्रस्ताव मांडल्यानंतर अनेक आध्यात्मिक, सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्याचे स्वागत केले होते. या घाटाची ओळख माऊलींच्या ज्ञानेश्वरी ग्रंथामुळे निर्माण व्हावी, यासाठी सर्व स्तरातून सकारात्मक पाठिंबा मिळणे गरजेचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.