Balasaheb Thackeray History Repeats : बाळासाहेबांना काँग्रेससोबत गेल्यावर 10 वर्षे संघर्ष करावा लागला; आता उद्धव ठाकरेंसमोर त्याहून मोठं संकट?

Balasaheb Thackeray Emergency-era Congress support 1975 Uddhav Thackeray 2019 alliance with Congress-NCP, history seems repeating itself Shiv Sena faces another political crisis : शिवसेनेचा इतिहास पुन्हा चर्चेत आला असून, बाळासाहेब ठाकरेंच्या वाट्याला आलेला राजकीय संघर्ष पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या वाट्याला आल्याचे चित्र दिसत आहे.
Balasaheb And Uddhav Thackeray
Balasaheb And Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Shiv Sena Congress Alliance History : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्याच्या घडामोडी पाहता शिवसेनेचा इतिहास पुन्हा चर्चेत आला आहे. काँग्रेस असो वा राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसी विचारधारेच्या पक्षांशी जवळीक करणे उद्धव ठाकरे यांना भोवले तसे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना देखील तत्सम भूमिका घेणे राजकीयदृष्ट्या अडचणीचे ठरले होते.

1975 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केल्यानंतर बाळासाहेब ठाकरे आणीबाणीला उघडपणे पाठिंबा दिला. हे निमित्तमात्र झाले आणि त्यानंतर जवळपास दशकभर त्यांना पक्षासाठी मोठा संघर्ष करावा लागला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 2019 मध्ये भाजपसोबतची (BJP) युती तोडून त्यांनी महाविकास आघाडी स्थापन केली राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्तेत बसल्याचे निमित्त झाले आणि विचारधारा दूर सारल्याचा आरोप करत मूळ शिवसेनेतून फुटून एकनाथ शिंदे शिवसेना पक्ष वेगळा झाला. शिवसेना फुटली, पुढे जाऊन आता खासदार आणि आमदार फुटले. अगदी मुंबई महापालिकेचे नगरसेवक देखील फोडण्याची धास्ती निर्माण झाली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत सरकार स्थापन केल्यानंतर सुरू झालेला संघर्ष आजही थांबलेला नाही. उलट तो अधिक तीव्र होताना दिसतो आहे. परिणामी बाळासाहेब ठाकरेंच्या वाट्याला आलेला राजकीय संघर्ष पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या वाट्याला आल्याचे चित्र दिसत आहे.

1975मध्ये बाळासाहेबांचा निर्णय आणि शिवसेनेची मोठी पडझड

काँग्रेस विरुद्ध देश अशी विभागणी झाली, संसद स्थगित होऊन सर्व अधिकार एकहाती एकवटले, अनेक राजकीय आणि वैचारिक विरोधक तुरुंगात डांबले गेले, तेव्हा हा निर्णय घेणाऱ्या इंदिरा गांधींच्या बाजूने जे मोजकेच उभे होते, त्यात बाळासाहेब आणि शिवसेना होते. 25 जून 1975 रोजी आणीबाणी लागू झाल्यानंतर बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी त्याला तात्काळ पाठिंबा दिला. देशात शिस्त निर्माण होईल आणि मजबूत नेतृत्व उभं राहील, असा त्यांचा विश्वास होता. बाळासाहेब अनेकदा “लोकशाहीपेक्षा ठोकशाहीवर माझा विश्वास आहे” असे जाहीरपणे म्हणत असत. मात्र या निर्णयाचा मोठा राजकीय फटका शिवसेनेला बसला. प्रसारमाध्यमांवर निर्बंध आले, लोकशाहीवादी शक्ती एकत्र आल्या आणि देशभरात काँग्रेसविरोधी लाट निर्माण झाली. याच काळात जनतेला शिवसेना ही इंदिरा काँग्रेसचीच दुसरी बाजू वाटू लागली.

Balasaheb And Uddhav Thackeray
Bhausaheb Wakchaure Vs Sadashiv Lokhande : ‘दुसऱ्यांदा ठाकरेंना दगा?’ भाऊसाहेब वाकचौरे शिंदे शिवसेनेत? आता सदाशिव लोखंडेंच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह

निवडणुकांत पराभव, मुंबईतही शिवसेना कमकुवत

1977 च्या लोकसभा निवडणुकीत बाळासाहेबांनी काँग्रेसची बाजू कायम ठेवली. राज्यभर प्रचारसभा घेतल्या. पण देशभर काँग्रेसचा पराभव झाला. त्यानंतर 1978 विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने काँग्रेससोबत आघाडी केली. निकाल धक्कादायक होता. शिवसेनेला एकही जागा मिळाली नाही. त्याच वर्षी झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेची ताकद निम्म्यावर आली. 40 नगरसेवकांवरून पक्ष थेट 21 जागांवर आला. मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकवू शकलो नाही तर राजीनामा देईन, अशी घोषणा बाळासाहेबांनी केली होती.

Balasaheb And Uddhav Thackeray
Balasaheb Thackeray controversy : बाळासाहेबांच्या वक्तव्याची शिंदेंसमोर खिल्ली; ठाकरेंच्या शिलेदाराच्या संतापाचा स्फोट, म्हणाला, ‘हे तर अमित शाहांचे सैनिक..!’

शिवाजी पार्कवरील नाट्यमय क्षण

पराभवानंतर शिवाजी पार्कवरील सभेत बाळासाहेबांनी खिशातून राजीनाम्याचा कागद काढला आणि शिवसेनाप्रमुख पद सोडत असल्याची घोषणा केली. या घोषणेमुळे शिवसैनिक भावनिक झाले. हजारो कार्यकर्त्यांनी “तुम्ही आम्हाला सोडून जाऊ शकत नाही” अशी आर्त विनंती केली. अखेर बाळासाहेबांनी राजीनामा मागे घेतला आणि त्यानंतर शिवसैनिक-नेतृत्व यांचं नातं अधिक मजबूत झालं.

काँग्रेससोबतची साथ तुटली आणि हिंदुत्वाचा मार्ग

1980 मध्ये पुन्हा काँग्रेससोबत जवळीक वाढली. यात शिवसेना एकही जागा न लढता काँग्रेसबरोबर राज्यातील विधानसभा निवडणुकीला समोरं गेली. जनता पक्षाचा दारूण पराभव झाला. त्यांना 17 जागा मिळाल्या. काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवलं. 186 जागा जिंकल्या. शरद पवार यांच्या समाजवादी काँग्रेसने 47 जागा जिंकल्या. विधानसभेपूर्वी शिवसेनेला काँग्रेस दिलेला शब्द पाळला. शिवसेनेचे मनोहर जोशी, प्रमोद नवलकर आणि वामनराव महाडिक यांना विधान परिषदेवर नियुक्ती देण्यात आली. पुढे मुंबईतील गिरणी संपानंतर संबंध ताणले गेले. अखेर 9 सप्टेंबर 1982 रोजी बाळासाहेबांनी काँग्रेसशी संबंध तोडल्याची घोषणा केली. 1984 मध्ये भिवंडी दंगलीनंतर शिवसेनेने आक्रमक हिंदुत्वाचा मार्ग स्वीकारला. याच काळात भाजपसोबत युती झाली आणि पुढे महाराष्ट्राच्या राजकारणात नवा अध्याय सुरू झाला.

2019मध्ये उद्धव ठाकरेंनी घेतलेला निर्णय आणि संघर्षाची सुरुवात

2019 विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबतची जुनी युती तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केले. हा निर्णय केंद्रातील नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या नेतृत्वातील भाजपला राजकीयदृष्ट्या मोठा धक्का मानला गेला. काळ जाऊ दिल्यानंतर 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत मोठं बंड घडले. तब्बल 40 आमदार फुटले, पुढे जाऊन पक्षासह धनुष्यबाण चिन्हही उद्धव ठाकरेंच्या हातातून गेले. 1989 पासून पुढे 34 वर्षं धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेनेची जनमानसातील ओळख होते. निवडणुकांमध्ये मशाल हे नवीन चिन्ह घेऊन ते जनमानसांत पुन्हा रुजवणे हे देखील एक आव्हान बनले.

आता खासदार, आमदारांमध्येही फूट

लोकसभा निवडणुकीनंतर परिस्थिती आणखी गंभीर होताना दिसत आहे. ठाकरेंच्या गटातील 9 पैकी 6 खासदार दूर गेल्याची चर्चा आहे. आता जवळपास 14 आमदारही एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. मुंबई महापालिकेतील 67 नगरसेवक देखील फोडण्याची भाषा काहींनी केली. राज्यात महायुतीचे सरकार मजबूत आहे आणि भाजप-शिंदे समीकरण अधिक प्रभावी होताना दिसत आहे.

इतिहासाची पुनरावृत्ती?

बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेससोबत राजकीय प्रयोग केला आणि 1975 ते 1985 हा दशकभराचा संघर्ष अनुभवला. उद्धव ठाकरे यांनी 2019 मध्ये महाविकास आघाडीचा प्रयोग केला आणि त्यानंतर पक्षाला सातत्याने धक्के बसत आहेत. फरक इतकाच की, बाळासाहेबांना निवडणुकांमध्ये अपयश येत होते पण संघटना टिकून होती. उद्धव ठाकरे यांना निवडणुकीत काही प्रमाणात यश मिळत असलं, तरी संघटनेला खिंडार पाडले जात असल्याचे दिसते आहे. ‘निष्ठेची वज्रमूठ’ फूट थांबवून पुन्हा संघटना बांधणीचे काम करणार का, 2019 पासून सुरू झालेला हा संघर्ष पुढची निवडणूक 2029 येईपर्यंत कोणत्या टप्प्यावर पोहोचणार आणि उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्या बळावर शिवसेनेचा राजकीय संघर्ष कोणते वळण घेईल, हे येणारा काळच सांगेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com