

Jalgaon Politics : जळगाव महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडीच्या हालचालींना आता वेग आला आहे. जळगावचे महापौर पद ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने इच्छुकांच्या हालचालींना वेग आला आहे. महापौर व उपमहापौर पदासाठी इच्छुक नवनिर्वाचित नगरसेवकांना २७ किंवा २८ जानेवारी रोजी नामनिर्देशन अर्ज दाखल करता येणार आहेत. त्यानंतर ३० किंवा ३१ जानेवारी रोजी नवनिर्वाचित सदस्यांची विशेष बैठक घेऊन मतदानाद्वारे महापौर व उपमहापौरांची निवड करण्यात येणार आहे.
जळगाव महापालिका निवडणुकीत भाजपने मित्रपक्ष असलेल्या शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोबत घेऊन महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवली. महायुतीने ७५ पैकी तब्बल ६९ जागा मिळवत एकतर्फी विजय मिळवला आहे. भाजपने ४६ जागा लढविल्या होत्या, त्यापैकी ६ बिनविरोध होऊन उर्वरित ४० जागांवर भाजपने बाजी मारत शंभर टक्के स्ट्राईक रेट राखला. तर, शिवसेनेने २३ पैकी २२ जागा जिंकल्या. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वाट्याला आलेल्या ५ पैकी केवळ प्रफुल्ल देवकरांची जागा जिंकता आली.
महायुतीत भाजप मोठा भाऊ ठरल्याने महापौर भाजपचाच होणार, हे निश्चित झाले आहे. भाजपने या वेळी महापौरपदासाठी 'सुरेशदादा जैन पॅटर्न' राबविण्याचे ठरविले असून, त्या अंतर्गत पाच वर्षांत पाच जणांना महापौर पदासाठी संधी दिली जाण्याची शक्यता आहे. तसेच स्थायी समिती सभापतिपदही दरवर्षी वेगवेगळ्या सदस्यांना मिळेल, असे ठरल्याचे सांगितले जात आहे.
सध्या महापौर पदाच्या रेसमध्ये दीपमाला काळे, उज्ज्वला बेंडाळे यांच्यासह वैशाली अमित पाटील आदींची नावे चर्चेत पुढे आहेत. सामाजिक आणि शहराच्या विविध भागाला न्याय देण्याच्या उद्देशाने भाजपने 'सुरेशदादा जैन पॅटर्न' राबविण्याचे ठरविले असल्याचे कळते आहे. त्यानुसार पाच वर्षांसाठी पाच महापौर म्हणजे दरवर्षी एकाला संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान महापौर भाजपला जात असल्याने शिवसेनेकडे उपमहापौरपद जाण्याची चिन्ह आहेत. सलग पाच वर्ष शिवसेनेकडे उपमहापौर पद जाऊ शकतं. तर स्थायी समिती सभापतीपदही भाजप आपल्याकडेच ठेवण्याची शक्यता असून सलग पाच वर्षे राहील. त्यातही दरवर्षी नवीन सदस्याला या पदासाठी संधी दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान शिवसेनेला सत्तेत किती वाटा मिळतो हे पाहावे लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.