
Jalna Antarwali Sarati lathicharge : जालना इथं अंतरवाली सराटीमध्ये मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यामागे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा आमदार असल्याचा गंभीर आरोप अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री छगन भुजबळ यांनी केला.
यावर आमदार रोहित पवार यांनी अहिल्यानगरमध्ये माध्यमांशी बोलताना मंत्री छगन भुजबळ यांच्या कच्चा अभ्यासाची चिरफाड केली आहे.
रोहित पवार म्हणाले, "छगन भुजबळांचा अभ्यास कच्चा आहे. लोकांना अन् त्यांना देखील माहिती आहे की, कुणीतरी पोलिस प्रशासनाला आदेश दिला. एका बाजुला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची प्रशंसा करता. देवेंद्र फडणवीस त्यावेळी कोण होते? होम मिनिस्टर होते. मग तिथं असणारा पोलिस अधिकारी फक्त होम मिनिस्टरचा आदेश ऐकणार, अख्या जगाने बघितलं आहे की, तिथं वरिष्ठ अधिकाऱ्याला फोन आला होता. होम मिनिस्टर कार्यालयातून फोन आल्याशिवाय वरिष्ठ पोलिस अधिकारी तिथं दंडेलशाही अथवा लाठीचार्ज करणार नाही."
'उलट तिथं होम मिनिस्टर कार्यालयातून आदेश आला अन् तिथं वातावरण निर्माण झालं. गरिब महिला, लहान मुल-मुली, वडिलधाऱ्यांची डोकी फुटल्याचं सर्वांनी पाहिलं आहे. त्यामुळे कोणत्याही समाजाचा कितीही मोठा नेता असला तरी या प्रकरणात कुणीही राजकारण करू नये, तिथं लाठीचार्ज किंवा रबर बुलेटचा वापर झाला असेल, तर कुणीही त्याचे समर्थन करू नये,' असेही रोहित पवार (Rohit Pawar) यांनी स्पष्ट केले.
छगन भुजबळ यांनी अंतरवाली सराटीतील लाठीचार्जबाबत आरोप करताना म्हणाले, तिथं 83 पोलिसांवर दगडफेक झाली. त्याचा प्लॅन आदल्या रात्री ठरला. त्यावेळेस पवारसाहेबांचा एक आमदार त्या बैठकीत सहभागी होता. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना वस्तुस्थिती माहित असतानाही, शरद पवार त्या ठिकाणी गेले, असा गौप्यस्फोट करत खळबळ उडवून दिली.
छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करताना, मंत्रिमंडळात सध्या एकमेव आशेचा किरण आहे तो म्हणजे, देवेंद्र फडणवीस! त्यांनी ओबीसी समिती दिली, समाजाला निधी दिल्याचंही त्यांनी म्हटलं.
मराठा आरक्षणावरून मंत्री छगन भुजबळ आक्रमक आहेत. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. यासाठी बीडमध्ये महाएल्गार मोर्चा 28 सप्टेंबरला आयोजित केला जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ चांगलेच आक्रमक झाले आहेत. छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात यावरून चांगली जुंपली आहे. दोघही एकमेकांविषयी आक्रमक शैलीचा वापर करताना समाजाच्या भावना दुखवल्या जातील, अशी विधान करत आहेत.
मंत्री छगन भुजबळ यांच्या आक्रमक विधानावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. प्रत्येक जण आपल्या व्यासपीठावर आपली भूमिका मांडत असतो. माझ स्पष्ट मत आहे की, समाजा समाजात तेढ निर्माण करू नका. आपल्याला कुठल्याच घटकाला नाराज करायचं नाही. प्रत्येक जण सद्सद्विवेक बुद्धीला धरून बोलत असतो, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.