BJP Vs NCP News: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच कामराज निकम यांनी भाजपला मोठा झटका दिला. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटात राजकीय वाद पेटला आहे.
मंगळवारी झालेल्या जिल्हा परिषद विशेष सभेत हा पक्षांतराचा वाद पुन्हा चर्चेला आला. कामराज निकम यांच्या पत्नी कुसुम निकम या भाजपच्या गटनेत्या आहेत. त्यांची या पदावरून हकालपट्टी करण्यात आली. संजीवनी शिसोदे यांची त्या पदावर नियुक्ती करण्यात आली.
यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर पाटील आणि कुसुम निकम हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या व्यासपीठावर गेले. कामराज निकम यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली. त्यामुळे त्यांच्या पत्नी निकम आणि श्री. पाटील यांना भाजपचे जिल्हा परिषद सदस्य म्हणून राहण्याचा नैतिक अधिकार राहिलेला नाही. त्यांनी आपल्या पदांचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.
भारतीय जनता पक्षाने २०२० मध्ये झालेल्या धुळे जिल्हा परिषद निवडणुकीत एक हाती सत्ता मिळवली होती. त्या निवडणुकीत कामराज निकम यांच्या पत्नी कुसुम निकम आणि त्यांचे सहकारी प्रभाकर पाटील हे देखील निवडून आले होते. मात्र भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत राजकारणाला दोष देत श्री. निकम यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
या प्रवेशाला आगामी विधानसभा निवडणुकीचे निमित्त आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून भाजपचे आमदार जयकुमार रावल यांना थेट आव्हान दिले जात आहे. त्यामुळे आगामी निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच आमदार रावल सध्या मतदारसंघ पिंजून काढत आहे.
आमदार जयकुमार रावल यांचे निकटवर्तीय आणि भाजपचे नेते निकम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच निकम यांनी आमदार रावल यांना मोठा झटका दिला आहे. या झटक्याने भारतीय जनता पक्षाचे सगळेच पदाधिकारी संतप्त झाले आहेत.
या भावनेतूनच सध्या भाजपने निकम यांच्या विरोधात मोहीम उघडली आहे. या संदर्भात भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष बबन चौधरी, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष धरती देवरे, सभापती ज्योती बोरसे, देवेंद्र पाटील, सोनी कदम, हर्षवर्धन दहिते, कैलास पावरा यांच्या उपस्थितीत बैठक झाली.
यावेळी भाजपने यापुढे आक्रमक भूमिका घेण्याचे जाहीर केले. बंडखोरांना इशारा देण्यासाठी ही बैठक होती. कामराज निकम यांनी केलेल्या आरोपांचा यावेळी चांगलाच समाचार घेण्यात आला. एकंदरच शिंदखेडा विधानसभा मतदारसंघाच्या घडामोडी धुळे जिल्हा भाजपसाठी हा चिंतेचा विषय बनला आहे.
आमदार जयकुमार रावल हे सध्या निवडणुकीची तयारी करीत आहेत. महाविकास आघाडीतर्फे हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सोडण्यात येणार आहे. या मतदारसंघातून पक्षाकडे उमेदवारीसाठी संदीप बेडसे यांसह विविध इच्छुक आहेत.
लोकसभा निवडणुकीत भाजपला या विधानसभा मतदारसंघातून मोठ्या दणका बसला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा उत्साह वाढला. त्यातूनच विधानसभा निवडणुकीच्या राजकीय हालचाली गतीमान झाल्या आहेत.
------
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.