Ahmednagar News: भंडारदरा-निळवंडे धरणातून पैठण धरणामध्ये प्रवरा नदीतून सांडव्याद्वारे पाणी सोडण्यात येणार आहे. यादरम्यान प्रवरा नदीवरील राहुरी तालुक्यातील रामपूर, केसापूर या कोल्हापुर बंधारा तर श्रीरामपूर तालुक्यातील मांडवे, गळनिंब, वळदगाव, पढेगाव, मालुंजा, भेर्डापूर, वांगी, खानापूर व कमलापूर या कोल्हापूर बंधारा परिसरात जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
समन्यायी पाणी वाटप धोरण कायद्यानुसार, नगर आणि नाशिक धरण समूहातून साडेआठ टीएमसी पाणी जायकवाडी धरणासाठी सोडण्याचे आदेश नुकतेच जलसंपदा विभागाने दिले होते. यानंतर पाणी सोडण्यास नगर नाशिक जिल्ह्यातून मोठा विरोध समोर आला, तर पाणी त्वरित सोडण्यात यावे, अशी मागणी मराठवाड्यातील जनतेने केली होती. या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. एकंदरीत न्यायालयाचे निर्देश पाहता सरकारने आता पाणी सोडण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
या अनुषंगाने नगर जिल्ह्यातील भंडारदरा निळवंडे धरणातील तीन टीएमसी पाणी जायकवाडी धरणासाठी सोडण्याचे नियोजित करण्यात आले आहे. त्या दृष्टीने जिल्हा पोलिस प्रशासन दक्ष झाले असून आज महसूल विभागाची महत्वपूर्ण बैठक जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ तसेच पोलिस अधीक्षक राकेश शोला आदी संबंधित प्रमूख विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत झाली. यामध्ये भंडारदरा निळवंडे धरणातून प्रवाहित होणाऱ्या पाण्याच्या परिसरात जमाबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहे.
नगर विभागाचे उपविभागीय दंडाधिकारी सुधीर पाटील यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (3) अन्वये प्रतिबंधात्मक स्वरूपात जमावबंदी आदेश जारी केले आहेत. पैठण धरणामध्ये सोडलेले पाणी सुरळीतपणे जाण्यासाठी फळ्या (बर्गे) काढण्यात येणार आहेत. नदीपात्रामध्ये पाणी सोडल्यानंतर काही ठिकाणी कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात शेतकरी बर्गे टाकण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे.
तसेच प्रवाह कालावधीत लाभधारकांकडून अनिधकृत पाणी उपसा करण्याची शक्यताही नाकारता येत नाही. यासाठी नेमलेल्या क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना दमदाटी मारहाण होवून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो, प्रतिबंधात्मक (जमावबंदी) आदेश लागलेल्या ठिकाणांवर कोणीही गर्दी करु नये, म्हणून या ठिकाणी संचार, वाहतूक, फिरणे व या परिसरात प्रवाह कालावधीत पाच किंवा अधिक व्यक्तीस एकत्र येण्यास मनाई राहील.
तसेच, अत्यावश्यक सेवा वगळता इतर कामांसाठी व्यक्तीच्या हालचालींवर, फिरण्यावर या कालावधीत निर्बंध राहील. या कालावधीत या ठिकाणांच्या आजुबाजूस 500 मीटर पर्यंतच्या परिसरात कार्यकारी अभियंता, अहमदनगर पाटबंधारे विभाग, अहमदनगर अंतर्गत नियुक्त केलेले अधिकारी, कर्मचारी व वाहने यांना वगळता कोणालाही प्रवेश करता येणार नाही, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.