Jaykumar Rawal News : आजवर भारतीय जनता पक्ष (BJP) आणि त्यांच्या नेत्यांनी फोडाफोडीचे राजकारण करून आनंद मिळवला. त्याला त्यांनी 'ऑपरेशन लोटस' असे गोंडस नाव दिले. मात्र. आता हे प्रकार त्यांच्यावरच उलटत असल्याचे चित्र आहे.
भाजप नेते आमदार जयकुमार रावल यांच्या शिंदखेडा मतदारसंघातील कामराज निकम यांनी भाजप सोडला. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीने हा प्रयोग केला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हे टायमिंग साधले. यावेळी भाजपचे आमदार अमेरिकेला होते. अमेरिकेहून परतल्यावर त्यांनी या प्रकारावर संताप व्यक्त केला. आमदार रावल यांनी आपल्या रावल गढीवर पदाधिकाऱ्यांचा एक मेळावा ठेवला.
सुमारे पाच तास हा मेळावा चालला. त्यात प्रत्येक नेत्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलेल्या निकम यांच्यावर तोंडसुख घेतले. यावेळी आमदार रावल यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, निकम यांनी माझ्या पाठीत खंजीर खुपसला. त्याचे खूप दुःख झाले. एका रात्रीत पलटले. मतदारसंघात काहीच कामे झाले नाही. विकास झाला नाही असे बोलत सुटलेत.
आम्ही त्यांच्यावर विश्वास टाकला. सर्वात जास्त पदे त्यांना दिली. त्यांच्या दारापुढे चार पाच वाहने उभी आहेत. ते पाहून तरी त्यांनी विकास झाला की नाही?, याचा विचार करायला पाहिजे होता. मात्र, त्यांनी आमच्याशी गद्दारी केली. गद्दार कधीही यशस्वी होत नाहीत. अशा शेलक्या शब्दात आमदार रावल यांनी त्यांचा समाचार घेतला.
या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार डॉ. सुभाष भामरे होते. जिल्हा अध्यक्ष बबन चौधरी हे देखील यावेळी उपस्थित होते. पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य अशा अनेक पदाधिकाऱ्यांनी या मेळाव्यात निकम यांच्यावर कठोर शब्दात टीका केली. त्यामुळे हा मेळावा चांगला चर्चेचा विषय ठरला. रावल हे पूर्वाश्रमीचे काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. त्यांनी दहा वर्षांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे संकट मोचक गिरीश महाजन यांचे ते निकटवर्तीय मानले जातात. या दोन्ही नेत्यांनी धुळे आणि जळगाव जिल्ह्यात अनेक मोठी पक्षांतरे घडवून आणली.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बंडखोरी घडली. त्यातून भाजपला (BJP) अनेक सत्ता पदे संपादित करता आली. सत्ता आल्यावर त्यांनी त्याचा आनंदही तेवढाच जोरदारपणे साजरा केला. त्याला त्यांनी 'ऑपरेशन लोटस' असे नाव दिले. कामराज निकम यांना फोडून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाने एक प्रकारे लहान स्वरूपात 'ऑपरेशन लोटस' ची परतफेड केली, असे म्हणता येईल. मात्र त्यावर आमदार रावल हे चांगलेच संतप्त झाले आहेत.
आता भाजप नेते रावल हे निकम यांना 'गद्दार' असे संबोधत आहेत. "गद्दार कधी यशस्वी होत नाहीत" असा दावा केला जात आहे. त्यामुळे भाजप नेते रावल यांनी केलेले हे विधान आणि व्यक्त केलेल्या संतप्त भावना राजकीय दृष्ट्या चांगल्या चर्चेचा विषय बनल्या आहेत.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.