

Ahilyanagar Shrigonda village decision : महिलांचा सन्मान महिला दिनापुरता मर्यादित राहता कामा नये तर कायमस्वरूपी त्यांचा अवमान होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. तसेच असा फक्त विचार करून थांबण्यापेक्षा ठोस उपाययोजना करणे जास्त महत्त्वाचे आहे. अशीच एक आदर्श कृती करण्याचे ठरवले आहे श्रीगोंद्याच्या कोळगाव ग्रामस्थांनी! कारण काही असो राग आला की किंवा नाही आला तरी सहज म्हणून सुद्धा आईच्या किंवा बहिणीच्या नावाने शिव्या दिल्या जातात.
प्रत्येकाच्या घरात आई- बहीण असूनही शिव्या देताना पहिल्यांदा त्यांचाच अवमान होतो. अशाच आणि इतरही प्रकारच्या अर्वाच्य शिव्यांमुळे वाद वाढतात, अगदी विकोपाला देखील पोहोचतात. याबाबत विचार करून शिव्यांवर, विशेषतः आई-बहिणीच्या, महिलांच्या नावाने असलेल्या शिव्यांवर श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव ग्रामपंचायतीने गावात पूर्णपणे बंदी घातली आहे.
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्ताने (Women Day) कोळगाव ग्रामपंचायतीने तसा ठरावच घेतला आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्त मौजे कोळगाव (ता. श्रीगोंदा, अहिल्यानगर) येथे ग्रामपंचायतीने आज, रविवारी विशेष महिला ग्रामसभेचे आयोजन केले. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ अंगणवाडी सेविका शकुंतला देशमुख होत्या. यावेळी गावात कोणीही शिवी दिल्यास समोरच्यांवर, वाद घालणाऱ्या दोन्ही व्यक्ती अथवा गटांवर दंडात्मक कारवाईची तरतूद या ठरावात करण्यात आली आहे. गावात कोणीही आई-बहिणींवरून शिवी दिल्यास 500 रुपये दंडाची कारवाई करण्याचा ठराव करत नवा संदेश दिला.
ग्रामसभेत गावातील शेतीसह विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर महिलांनी गावाच्या सामाजिक वातावरणाबाबत गंभीर चर्चा करत एक महत्त्वाचा निर्णय घेतला. गावात कोणीही आई-बहिणींवरून शिवी दिल्यास त्याचा व्हिडिओ ग्रामपंचायतीकडे (Gram Panchayat) सादर केल्यानंतर संबंधित व्यक्तीकडून 500 रुपयांचा दंड आकारण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. महिलांच्या सन्मानासाठी घेतलेला हा निर्णय गावात चर्चेचा विषय ठरला आहे.
याच बैठकीत स्वच्छतेबाबतही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. प्रत्येकाने आपले घर, दुकान आणि परिसर स्वच्छ ठेवावा. जर कोणाच्या घराजवळ किंवा दुकानाजवळ कचरा दिसून आला आणि त्याचा फोटो ग्रामपंचायत कार्यालयात सादर झाला, तर संबंधित व्यक्तीकडून 100 रुपयांचा दंड आकारण्यात येईल, असा ठरावही करण्यात आला तसेच गावात व्यसनमुक्ती आणि महिला सक्षमीकरणासाठी ठोस उपाययोजना राबविण्याचा निर्धारही महिलांनी व्यक्त केला.
ग्रामसभेला सरपंच पुरुषोत्तम यशवंत लगड, उपसरपंच विलास बाळासाहेब शितोळे, ग्रामपंचायत सदस्य जयराज लगड, तंटामुक्ती अध्यक्ष दत्तात्रय (गोटू) लगड, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र रणसिंग, कल्याण आढाव, प्रशांत आढाव, ग्रामपंचायत अधिकारी एस. एस. कवडे तसेच ग्रामपंचायत कर्मचारी, गावातील अंगणवाडी सेविका, आशासेविका आणि मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
यावेळी सरपंच पुरुषोत्तम लगड यांनी उपस्थित महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा देत महिला सक्षमीकरणासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे सांगितले. पुढील वर्षी महिला दिन आणखी मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. अध्यक्षीय भाषणात शकुंतला देशमुख यांनी महिलांच्या एकजुटीचे कौतुक करत, गावात सन्मान आणि संस्कार जपण्याचा हा उपक्रम इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.