

Kopargaon municipal election : कोपरगावमधील नगरपालिका निवडणूक रंगतदार स्थितीत पोहोचली आहे. महायुतमध्येच घमासान सुरू झाल्याने, त्याचे हादरे अख्ख्या जिल्ह्याला बसू लागलेत.
भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांच्याविरुद्ध भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे यांच्यात थेट राजकीय संघर्ष उफाळला आहे. दोन्ही बाजूकडील स्पर्ध एवढी वाढली आहे की, उमेदवार पळवण्यापर्यंत पोहोचली आहे. यातून विवेक कोल्हे यांनी, मंत्री विखे पाटील अन् आमदार काळे यांचे नाव टाळत, आका अन् त्यांचाजवळील काका या दोघांचा बंदोबस्त करण्याचा कौल कोपरगावकरांनी दिला आहे, असा सूचक इशारा दिला आहे.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव (Kopargaon) नगरपालिकेसाठी त्यांच्याकडील चार इच्छुकांना डावलून थेट भाजप पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे निकटवर्तीय काका कोयटे यांना नगराध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. विशेष म्हणजे, काका कोयटे हे कोल्हे यांच्याबरोबर निवडणुकीत प्रक्रियेत सहभागी होते. पण, ही राजकीय स्पर्धा आहे, ही विरोधकांची चाल कोल्हे यांनी खेळाडू वृत्ती घेतली. मात्र, विरोधकांच्या या खेळीवर सूचक, असा इशारा विवेक कोल्हेंनी दिला.
आमदार आशुतोष काळे यांनी भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच निकटवर्तीय काका कोयटे यांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेत, त्यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर केली. काका कोयटे यांनी, गेली 50 वर्षे समाजकारण अन् राजकारणात आहे. (कै.) शंकरराव काळे अन् कोल्हेंनी यांनी संधी दिली होती. गेल्या वेळेही चर्चा होती. पण आता पुन्हा संधी मिळाली आहे. कोपरगावच्या विकासासाठी आमदारांबरोबर असून, पालकमंत्र्यांची देखील साथ मिळणार असल्याचे सांगितले.
महायुतीमधील अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ही राजकीय खेळी होताच, विवेक कोल्हे यांनी पत्रकार परिषद घेत तोफ डागली. ते म्हणाले, 'काका कोयटे यांच्या संपर्कात मी, माजी आमदार स्नेहलता कोल्हे होते. अगदी उमेदवार जाहीर करण्यापूर्वी बैठक झाली. उमेदवार त्यांना सांगण्यात आले. त्यांच्याही प्रभागातील उमेदवार निश्चित करण्यात आले.' असे असताना अचानक तालुक्याबाहेर शक्ती सक्रिय झाल्या अन् नेहमीप्रमाणे तालुक्यावर वक्रदृष्टी पडली. आमचा उमेदवार कोपरगावमध्ये निश्चित झाले. ते काही इतर तालुक्यात, पुणे किंवा मुंबईत निश्चित झालेले नाहीत, असा टोला लगावला.
"महिनोंमहिने संपर्कात असलेले कोयटे यांना अचानक शहर विकासाचा पुळका आला. यातून त्यांनी आम्हाला अंधारात ठेवून राजकीय दगाफटका केला. पण त्यांच्या या निर्णयामुळे कोपरगावकरांची रिअॅक्शन आली आहे. त्यामुळे लादलेले पार्सल ते परतून लावलं जाईल. दिलेला उमेदवार हा काळे गटाचा नसून तालुक्याबाहेरच्या नेतृत्वाचा आहे. तालुक्यातील युवा नेतृत्व पुढं जात आहे, ते थोपवण्यासाठी हा उद्योग सुरू आहे. आकांच्या आदेशावरून काका निवडणुकीत उतरले आहे. परंतु, प्रवरातिरीचं हे पार्सल आम्ही परतून लावू," असा इशारा विवेक कोल्हेंनी दिला.
कोपरगाव नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीमधील राजकारण चांगलेच तापले आहे. विवेक कोल्हे यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत थेट देशाच्या नेतृत्वाचा उल्लेख केल्यानं, त्याचे हादरे लांबपर्यंत जाणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. सध्या कोल्हेविरुद्ध विखे पाटील-काळे यांच्यातील राजकीय घमासानचे हादरे अख्ख्या जिल्ह्याला बसू लागले आहेत.
विशेष म्हणजे, विखे अन् कोल्हे एकाच पक्षातील आहे. पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जिल्ह्यात महायुतीमध्ये एकसंघ राहिली नसल्याची दखल महायुतीमधील पक्ष नेतृत्व कसं घेणार, आता याकडे लक्ष लागलं आहे. नगरपालिका निवडणुकानंतर जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या निवडणुका आहेत. महायुती इथंच फिस्कटल्याने त्याचा परिणाम आगामी संस्थांच्या निवडणुकीवर होईल, असे राजकीय विश्लेषणकांचे निरीक्षण आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.