Congress News : लोकसभा निवडणुकीसाठी अवघ्या तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. मात्र, धुळे मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार कोण याचे उत्तर मिळालेले नाही. उमेदवारीसाठी अनेकांकडून दावा सांगितला जातो आहे. मात्र, मला उमेदवारी द्या. मी धुळे मतदारसंघ जिंकून दाखवतो, असे म्हणत काँग्रेसचे नाशिक जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांनी दंड थोपटले आहे. तसेच काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून नाशिक, दिंडोरी आणि धुळे या तिन्ही लोकसभा मतदारसंघांवर दावा करण्यात आला आहे.
काँग्रेस पक्षाची विभागीय लोकसभा निवडणूक आढावा बैठक शनिवारी (ता. 27) धुळे येथे झाली. यावेळी नाशिक विभागातील सर्व आठ लोकसभा मतदारसंघांबाबत आढावा घेण्यात आला. महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांसह निरीक्षक म्हणून आलेल्या नेत्यांकडे पक्षाच्या नाशिकच्या पदाधिकाऱ्यांनी आग्रही मागणी करीत नाशिक, दिंडोरी आणि धुळे या तिन्ही मतदारसंघांवर दावा केला. Lok Sabha Election 2024
नाशिकचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांनी धुळे लोकसभा मतदारसंघात यंदा अतिशय अनुकूल वातावरण असल्याने काँग्रेस पक्षाला निश्चितपणे यश मिळेल, असा दावा केला. धुळे मतदारसंघाची विभागणी नाशिक आणि धुळे या दोन जिल्ह्यांत झाली आहे. नाशिकचे बागलाण मालेगाव शहर आणि मालेगाव बाह्य असे तीन विधानसभा मतदारसंघ धुळे लोकसभा मतदारसंघात मोडतात. त्यात दहा लाख मतदार नाशिक जिल्ह्यातील आहेत. साधारणतः 49 टक्के नाशिक आणि 51 टक्के धुळे अशी मतदारांची विभागणी आहे. त्यामध्ये मालेगाव आणि धुळे हा मुस्लिमबहुल विधानसभा मतदारसंघ काँग्रेस पक्षाला अनुकूल आहे, असे गणित मांडले जात आहे.
धुळे लोकसभा मतदारसंघ गेल्या तीन निवडणुकांपासून भारतीय जनता पक्षाकडे आहे. गेल्या तिन्ही निवडणुकीत भाजपचे प्रताप सोनवणे एकदा आणि धुळ्याचे डॉ. सुभाष भामरे दोन वेळा विजयी झाले आहेत. काँग्रेस पक्षाला येथे विजय मिळू शकला नव्हता. आगामी निवडणुकीत राजकीय समीकरणे बदललेली असून शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट एकत्र लढणार आहे. त्यात वंचितसोबत महाविकास आघाडीची चर्चा सुरू असून वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत आली तर या मतदारसंघात ताकद वाढणार आहे.
मुस्लिम मताच्या विभागणीचा भारतीय जनता पक्षाचा डाव यंदा यशस्वी होऊ दिला जाणार नाही. त्यासाठी आम्ही सक्रिय असून मतदारसंघात संपर्क ठेवून आहोत. त्यामुळे काँग्रेस पक्षाने धुळे मतदारसंघात प्राधान्याने व लवकर उमेदवारीचा निर्णय घ्यावा. त्यामुळे आम्हाला आत्मविश्वासाने निवडणुकीला सामोरे जाता येईल, असेही डॉ. शेवाळे आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे उमेवारीसाठी शामकांत सनेर (धुळे), निवृत्त आयपीएस अधिकारी अब्दुर रहमान आणि डॉ. शेवाळे हे तीन उमेदवार आघाडीवर असल्याने कोणाला उमेदवारी मिळणार, याची चर्चा आहे.
(Edited By Roshan More)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.