Dhule Lok sabha Election 2024: धुळे लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे (Dr. Subhash Bhamre) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपकडे उमेदवारीसाठी नऊ इच्छुक होते, तर प्रतिस्पर्धी काँग्रेस पक्षाला मागील दोन महिन्यांत सक्षम उमेदवार सापडलेला नाही. त्यामुळे स्थानिक नेते सुस्त असल्याचा संदेश सगळीकडे गेला आहे. काँग्रेस (Congress) पक्षाकडे धुळ्याचे जिल्हा अध्यक्ष श्याम सनेर आणि नाशिकचे जिल्हा अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे या दोघांची इच्छुक म्हणून नावे घेतली जात होती.
दरम्यान, काँग्रेसने (Congress) लोकसभा आढावा बैठक धुळे शहरात घेतली. त्याचा प्रमुख उद्देश पक्षाची यंत्रणा सक्रिय करणे आणि सक्षम उमेदवाराचा शोध हा होता. मात्र, बैठक संपली आणि त्यानंतर कार्यकर्त्यांमधील उत्साहदेखील मावळल्याचं चित्र पाहायला मिळालं. प्रयत्न करूनही तिसरा उमेदवार येथे मिळाला नाही. त्यामुळे अनुकूल वातावरण असूनही धुळे (Dhule) लोकसभा मतदारसंघ काँग्रेसने भाजपसाठी सोडला की काय? अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली होती.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
धुळे मतदारसंघासाठी (Dhule Constituency) थेट दिल्लीतूनच सर्च घेण्यात आला. यामध्ये पक्षनिष्ठेला प्राधान्य देण्यात आले आहे. भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) विरोधी पक्षाच्या खासदारांना आमिष दाखविण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन राष्ट्रीय स्तरावर उमेदवारी देताना एकनिष्ठ कार्यकर्ता हे निष्कर्ष ठरविले आहे. त्यात काँग्रेसच्या माजी राज्यमंत्री आणि नाशिकच्या माजी महापौर डॉ. शोभा बच्छाव (Dr. Shobha Bachhav) यांचे नाव पुढे आले आहे. त्यामुळे धुळ्यातून आता डॉ. भामरे विरुद्ध डॉ. बच्छाव अशी लढत होण्याची शक्यता आहे.
यासंदर्भात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी गेल्या आठवड्यात डॉ. बच्छाव यांच्याशी उमेदवारीबाबत सविस्तर चर्चा केली आहे. पक्षाकडून बच्छाव यांची शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या आठवडाभरात काँग्रेसच्या यादीत धुळ्याचे उमेदवार म्हणून डॉ. शोभा बच्छाव यांची उमेदवारी जाहीर होऊ शकते. बच्छाव यांनीही त्याला दुजोरा दिला आहे. मात्र, ज्या पद्धतीने उमेदवाराचा शोध घेण्यात धुळ्याचे नेते उदासीन राहिले, तीच उदासीनता प्रचारात राहते की काय? अशी स्थिती आहे.
दरम्यान, धुळे मतदारसंघासाठी सुरुवातीला शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार शरद पाटील यांनी मतदारसंघ शिवसेनेला सोडल्यास सक्षम उमेदवार देण्याची तयारी दाखविली होती. असाच पर्याय मालेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) गटाचे नेते राजेंद्र भोसले यांनीही उमेदवारी करण्याची तयारी दाखविली होती. मात्र, काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांप्रमाणेच वरिष्ठ नेत्यांनीही त्याला फारसा प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे सक्षम उमेदवाराचा शोध घेण्याचे काम गांभीर्याने करण्यात काँग्रेस पक्षालाच रस आहे की नाही, अशी चर्चा रंगली आहे.
(Edited By Jagdish Patil)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.