
Ahilyanagar News : विधानसभा निवडणुकीच्या जाहीर प्रचार थंडावला असून, आता छुप्या प्रचाराला वेग आला आहे. तसंचे प्रशासन देखील उद्याच्या 20 नोव्हेंबरच्या मतदान प्रक्रियेसाठी सज्ज झालं आहे.
अहिल्यानगर जिल्हा प्रशासनाने 12 मतदारसंघातील मतदान यंत्रणा सज्ज केली असून, मतदान प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. 4 हजार जणांवर प्रतिबंधक कारवाई, मतदान केंद्रावर ड्रोनचा वॉच, मतदान केंद्रावर मोबाईलला बंदी, मतदानापूर्वीच बोटाला शाई लावण्याच्या प्रकारांवर कारवाई, गर्दी, वाहतूक कोंडींचे नियोजनासह ज्यांचे जिल्ह्याच्या कोणत्याही मतदारसंघात मतदान नाही, अशांना जिल्हाबाहेर जाण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी उद्या 20 नोव्हेंबरच्या मतदान होत आहे. उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार असून, यासाठी अहिल्यानगर जिल्हा प्रशासनाकडून मतदान (Vote) प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्यात. मतदान केंद्रांवर ड्रोन कॅमेराच्या वॉच असणार आहे. जिल्ह्याच्या कोणत्याही मतदारसंघात मतदान नाही, अशांना जिल्हा बाहेर जाण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. येत्या दोन दिवसात जिल्ह्यातील लॉज, ढाबे आणि हॉटेलची विशेष तपासणी मोहीम राबवली जात आहे. मतदार नसल्याचे कोणी आढळल्याल, त्यांच्यावर कारवाई केली जात आहे.
जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघात 37 लाख 83 हजार 987 मतदार आहेत. जिल्ह्यातील तीन हजार 765 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पोलिस (Police) बंदोबस्त तैनात केला आहे. 21 हजार 574 अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ आणि पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी दिली. 99% च्या वर मतदारांपर्यंत मतदार स्लिपा वाटप झाल्या आहेत.
जिल्ह्यातील 4 हजार 200 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. जिल्ह्यातून 278 जणांना हद्दपार केले गेले आहे. त्यांनी मतदानासाठी अर्ज केला, तर सकाळी तीन तासांसाठी सवलत दिली जाणार आहे. हिस्ट्री सीटर, फरार आणि हद्दपार गुंडांची विशेष शोध मोहीम सुरू आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 31 कोटी 19 लाख रुपये किमतीची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
यात सव्वा कोटींची रोख रक्कम तसेच दारू, मौल्यवान वस्तू, अमली पदार्थांचा समावेश आहे. आर्म अॅक्ट नुसार 26 फायर फार्म व 43 शार्प वेपन जप्त करण्यात आलेत. तसेच 2 हजार 352 अग्नी शस्त्रे जमा करून घेण्यात आली आहेत. संवेदनशील असलेल्या संगमनेर व अहमदनगर मतदारसंघांमध्ये विशेष पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
आचारसंहिता भंगाच्या 217 तक्रारी आल्या होत्या त्यांचा अवघ्या 32 मिनिटात निपटारा करण्यात आला आहे. याशिवाय ई-मेल, फोन व प्रत्यक्षपणे करण्यात आलेल्या 33 तक्रारींचाही निपटारा झाला आहे. यात विनापरवाना बॅनर्स व झेंडे वापरणे, खासगी संस्थांचे कर्मचारी प्रचारात सहभागी होणे, परवानगी न घेता वाहनावर उमेदवाराचा फोटो लावणे, विनापरवाना प्रचार कार्यालय, भाषणातील वक्तव्य, प्रचारासाठी धार्मिक स्थळाचा वापर अशा तक्रारींचा समावेश आहे. पोलिसांनी आचारसंहिता भंगाबाबत आत्तापर्यंत बारा गुन्हे दाखल केले आहेत.
जिल्ह्यातील सर्व 12 मतदार संघातील प्रत्येकी तीन मतदान केंद्र आदर्श केंद्रे करण्यात आलीत. यात महिला संचलित मतदान केंद्र, दिव्यांग संचलित मतदान केंद्र व युवक संचलित मतदान केंद्र प्रत्येकी एक आहे. याशिवाय मुस्लिम बहुल मतदार असलेल्या 149 मतदान केंद्रांवर पडदामशीन मतदान केंद्र करण्यात आले आहे. जिल्ह्यातील 2 हजार 85 मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग करण्यात येणार आहे. 75 टक्के पेक्षा जास्त मतदान उद्दिष्ट प्रशासनाचे आहे.
त्यामुळे जिल्ह्यातील ज्या मतदान केंद्रावर सर्वोच्च मतदान होईल, त्या गावाला विशेष प्रशस्तीपत्र व ट्रॉफी देण्यात येणार आहे. तसेच ज्या महाविद्यालयातील नवीन मतदारांपैकी ज्यांचे शंभर टक्के मतदान होईल, त्या महाविद्यालयालाही गौरवले जाणार आहे. आतापर्यंत 85 वर्षावरील 2 हजार 173 व 340 दिव्यांगांचे गृह मतदान झाले आहे. कर्मचाऱ्यांपैकी 14 हजार 278, अत्यावश्यक सेवेतील 56 व सैनिक मतदारांपैकी 322 जणांचे मतदान झाले आहे.
मतदान केंद्र परिसरात कोणालाही मोबाईल घेऊन जाण्यास परवानगी नाही. मतदान केंद्राच्या 200 मीटर परिघात मोबाईल नेण्यास बंदी आहे. मतदान केंद्रात छायाचित्र घेणे व छायाचित्रण करण्यासही प्रतिबंध आहे, असे कोणी करताना आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.