Ahilyanagar News : आचारसंहितेच्या काळात राहुरीतील महात्मा फुले कृषि विद्यापीठात द्वेषपूर्ण अन्यायकारक नियमबाह्य बदली आणि पदोन्नतीचे प्रकरण कुलगुरू प्रशांतकुमार पाटील, कुलसचिव डाॅ. मुकुंद शिंदे, उपकुलसचिव व्ही. टी. पाटील यांच्या चांगलेच अंगलट आले आहे.
राहुरी विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कुलगुरू प्रशांतकुमार पाटील यांच्यासह विद्यापीठातील अधिकाऱ्यांविरोधात आलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेतली. प्राथमिक चौकशीनंतर अहिल्यानगर जिल्ह्याचे आचारसंहिता कक्ष तथा अपर जिल्हाधिकारी यांना आचासंहिता भंगचा गुन्हा दाखल करून अटक करावी, असे पत्र दिल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे.
कुमार भिंगारे यांनी 18 ऑक्टोबरमध्ये आचारसंहिता लागू झाल्यानंतर महात्मा फुले कृषि विद्यापीठाने पदोन्नतीचा आदेशा काढला अशी तक्रार केली होती. या तक्रारीचा पाठपुरावा करताना त्यांनी 22 ऑक्टोबरमध्ये निवडणूक (Election) निर्णय अधिकाऱ्यांना पत्र दिले. त्यानंतर उमेदवार जालिंदर घिगे यांनी पाच नोव्हेंबरला कुमार भिंगारे यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने महात्मा फुले कृषि विद्यापीठातील प्रकल्पग्रस्त गावातील अधिकारी आणि कर्मचारी यांना आश्वस्त प्रगती योजनेचा लभा देण्यासाठी अटी शिथील करणारे परिपत्रक काढल्याने आणि प्रकल्पग्रस्त गावातील मतदारांना आकर्षित करून आचारसंहिता भंग केल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. सुदाम कोथिंबिरे यांनी देखील यासंदर्भात तक्रार केली आहे.
या सर्व तक्रारीवर कुलगुरू प्रशांतकुमार पाटील, कुलसचिव डॉ. मुकुंद शिंदे, उपकुलसचिव व्ही. टी. पाटील यांचेकडून वेळोवेळी खुलासा मागविण्यात आला होता. त्यानुसार त्यांनी खुलासे सादर केले. यामध्ये पदोन्नतीचे अथवा बदलीचे आदेश आचारसंहिता (Code of Conduct ) लागू होण्यापूर्वी 15 ऑक्टोबर 2024 ला सकाळी 9.30 व सकाळी 9.45 वाजता निर्गमित केल्याचे म्हटले आहे.
तसेच अधिकारी आणि कर्मचारी यांना आश्वस्त प्रगती योजनेचा लाभ देण्यासाठी अटी शिथिल करणारे परिपत्रक दैनंदिन कार्यालयीन कामकाजाचा भाग असल्याचे म्हटले आहे. परिपत्रकास 14 ऑक्टोबर 2024ला आयोजित केलेल्या निवड समितीच्या बैठकीमध्ये मान्यता घेतली असून 15 ऑक्टोबर 2024 ला निर्गमित केल्याचे म्हटले आहे. त्यामुळे खुलासे मान्य करून तक्रार निकाली काढावी, अशी विनंती केली होती.
राहुरी विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी या तक्रारींची आणि कुलगुरू यांच्या खुलाशाची चौकशी केली. चौकशीत तक्रार अर्ज व त्यासोबत सादर केलेली कागदपत्रे तसेच अधिकाऱ्यांनी सादर केलेले खुलासे आणि त्यासोबत जोडलेली कागदपत्रे तपासली. यात तपासणीमध्ये आचारसंहिता लागू होण्याच्या दिवशी अधिकारी, कर्मचारी यांच्या पदोन्नती आणि बदलीचे आदेश निर्गमित केल्याचे स्पष्ट होत आहे.
तसेच, आश्वस्त प्रगती योजनेचा लाभ आचारसंहिता लागू झाल्यानंतर प्रकल्पग्रस्त गावातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देण्यासाठी अटी शिथील करणारे परिपत्रक काढल्याने व प्रकल्पग्रस्त गावातील मतदारांना आकर्षित करून आचारसंहिता भंग केल्याने त्यांचेविरुध्द गुन्हे दाखल करण्यात यावेत, असे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी म्हटले आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अहिल्यानगर जिल्ह्याचे आचारसंहिता कक्ष तथा अपर जिल्हाधिकारी यांना हे पत्र दिल्याने कृषि विद्यापीठात खळबळ उडाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.