

Cooperative Sector Corruption Maharashtra : महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकरी आणि ऊस वाहतूकदारांची साखर कारखान्यांकडून होणारी पद्धतशीर लूट आता गंभीर टप्प्यावर पोहोचली आहे. सोलापूर इथल्या केवड आणि अहिल्यानगरमधील श्रीगोंद्यातील या साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांबरोबर हा प्रकार झाला आहे.
यात शेतकऱ्यांनी कारखान्याकडे दिलेल्या कागदपत्रांचा गैरवापर करत बँकांकडून लाखो रुपयांचे परस्पर कर्ज काढण्याचा प्रकार घडला आहे. आता या कर्ज वसुलीचा तगादा सुरू केल्यानंतर हा फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. या घोटाळ्याच्या चौकशीसाठी आणि न्यायासाठी शेतकरी सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवूनही त्यांना दिलासा मिळत नसल्याने हतबल झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जवळके (ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) येथील राम लक्ष्मण बोराडे आणि संभाजी लक्ष्मण बोराडे हे ऊस वाहतूक व्यवसायाशी संबंधित आहेत. आरोपानुसार, केवड (ता. बार्शी, जि. सोलापूर) येथील एका साखर कारखान्याने कर्नाटकातील चंदड साखर कारखान्यासोबत संगनमत करत बोराडे बंधूंच्या मालकीच्या वाहनांची कागदपत्रे वापरली. संबंधित शेतकऱ्यांची (Farmer) कोणतीही परवानगी न घेता त्यांच्या नावावर तब्बल सहा लाख रुपयांचे कर्ज उचलण्यात आले.
या कर्जाचा संपूर्ण बोजा आता थेट बोराडे बंधूंच्या डोक्यावर पडला आहे. विशेष म्हणजे, बँक (Bank) ऑफ बडोदाच्या सोलापूर शाखेकडून थकबाकी वसुलीसाठी वारंवार नोटिसा पाठवल्या जात असल्याने पीडित शेतकरी प्रचंड मानसिक तणावाखाली आहेत.
या प्रकरणामुळे आणखी एक गंभीर बाब समोर आली आहे. साखर कारखान्यांचे व्यवस्थापन, अकाउंट विभाग, शेतकी अधिकारी आणि संचालक मंडळ यांच्या संगनमताने वाहनधारकांच्या कागदपत्रांचा गैरवापर करून लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक करणारे रॅकेट कार्यरत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
या संपूर्ण प्रकाराविरोधात पीडित शेतकऱ्यांनी विविध सरकारी यंत्रणांकडे लेखी तक्रारी दाखल केल्या. मंत्रालय स्तरापर्यंत पाठपुरावा करण्यात आला. मात्र, अनेक महिने उलटूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे आता न्यायालयीन लढाईशिवाय पर्याय उरलेला नसल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, अशाच प्रकारचा आणखी एक गंभीर घोटाळा अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात उघड झाला आहे. हिरडगाव येथील श्री साईकृपा शुगर अलाईड इंडस्ट्रियल लिमिटेड या कारखान्यात 2014 आणि 2015 च्या गळीत हंगामात अनेक शेतकऱ्यांनी ऊस वाहतूक केली होती. मात्र या वाहतुकीचे तब्बल 8 ते 8.5 लाख रुपये कारखान्याने वर्षानुवर्षे थकवून ठेवले.
पीडितांनी जेव्हा अधिकृत अकाउंट स्टेटमेंट मागवले, तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली. शेतकऱ्यांच्या कष्टाने कमावलेल्या पैशांची रक्कम कारखान्याने परस्पर पाच अनोळखी व्यक्तींच्या नावावर डेबिट दाखवून वजा केल्याचे समोर आले. ही रक्कम नेमकी कुठे गेली, कोणाच्या खात्यात वळवली गेली आणि कोणाच्या आदेशाने वजा करण्यात आली, याचे उत्तर कारखाना प्रशासनाकडे नाही.
याहून संतापजनक बाब म्हणजे या प्रकरणी सहकार विभाग आणि अहिल्यानगर प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाने पीडितांना लेखी उत्तर देताना स्पष्ट केले की, अशा आर्थिक फसवणुकीवर कारवाई करण्यासाठी किंवा शेतकऱ्यांची थकबाकी मिळवून देण्यासाठी सरकारकडे कोणतीही विशेष कायदेशीर तरतूद उपलब्ध नाही.
सरकारी यंत्रणांनीच हात वर केल्याने संतप्त शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकरी, ट्रान्सपोर्टर आणि वाहनधारकांची साखर कारखाने, बँका आणि व्यवस्थापन यांच्या संगनमतातून होत असलेली ही पद्धतशीर आर्थिक लूट रोखण्यासाठी राज्य सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा, दोषींवर गुन्हे दाखल करावेत आणि पीडित शेतकऱ्यांना कर्जाच्या जाचातून मुक्त करावे, अशी आर्त मागणी बोराडे बंधूंनी केली आहे.
या प्रकरणामुळे राज्यातील सहकार क्षेत्र, साखर कारखाने आणि शेतकरी सुरक्षेच्या यंत्रणांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, शेतकऱ्यांचे पैसे आणि कागदपत्रे सुरक्षित आहेत का? हा प्रश्न आता संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.