

Devendra Fadnavis live interaction : "सौर कृषीपंपामुळे केवळ दिवसा पाणी देण्याची सोय झाली, असे नाही, तर ठिबकद्वारे विद्राव्य खते देणंही सोपं झालं आहे. आता पिकांना पाणी देण्यासाठी रात्री-अपरात्री जागावे लागत नाही," अशा शब्दांत अहिल्यानगरच्या कर्जत तालुक्यातील खांडवी इथल्या शेतकरी लक्ष्मण येकाळ यांनी ‘मागेल त्याला सौर कृषीपंप’ योजनेचे फायदे आज मुख्यमंत्र्यांसमोर मांडले. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्याच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करत "तुमच्या बागेतील डाळिंब खायला आम्ही नक्की येऊ," अशी साद घातली.
राज्यात 'मागेल त्याला सौर कृषीपंप' योजनेअंतर्गत महावितरणने एकाच महिन्यात 45 हजार 911 सौर कृषीपंप स्थापित करून जागतिक उच्चांक गाठला आहे. या विक्रमाची 'गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये नोंद झाली असून, त्याचे प्रमाणपत्र प्रदान सोहळा आज शुक्रवारी छत्रपती संभाजीनगर इथं शेंद्रा एमआयडीसीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्र्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यातील निवडक लाभार्थी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यामध्ये अहिल्यानगरमधील कर्जत तालुक्यातील लक्ष्मण येकाळ यांचा समावेश होता.
यावेळी संवाद साधताना शेतकरी (Farmer) येकाळ म्हणाले, "मी ऑक्टोबर महिन्यात सौर पंपासाठी अर्ज केला होता आणि अवघ्या एका महिन्यात, म्हणजेच नोव्हेंबरमध्ये मला सौर पंप मिळाला. या तत्पर सेवेमुळे माझ्या 2 हेक्टर क्षेत्रातील डाळिंब बागेला वेळेवर पाणी देणे शक्य झाले. सौर पंपामुळे दिवसा वीज उपलब्ध असल्याने ठिबक सिंचनाद्वारे पिकांना विद्राव्य खतं देणं सोपं झालं आहे. या योजनेमुळे रात्रीचे जागरण थांबले असून, महावितरण आणि राज्य सरकारचे मी मनापासून आभार मानतो."
शेतकऱ्याचे हे मनोगत ऐकून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येकाळ यांना त्यांच्या शेतीविषयी आत्मीयतेने विचारपूस केली. तुमच्याकडे किती शेती आहे आणि बाग कशाची आहे? असे मुख्यमंत्र्यांनी विचारले असता, येकाळ यांनी दोन हेक्टर क्षेत्रात डाळिंबाची बाग असल्याचे सांगितले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी मिश्कीलपणे "मग आम्ही तिकडे आलो की तुमचे डाळिंब खायला नक्की येऊ," असे म्हणताच टाळ्यांचा कडकडाट झाला.
शेतकऱ्यांच्या जीवनात सौर कृषीपंपामुळे आलेला हा बदल आणि त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून मुख्यमंत्र्यांनी "व्हेरी गुड, फारच छान," अशा शब्दांत त्यांचे कौतुक केले. एका महिन्यात सर्वाधिक सौर पंप बसविण्याच्या या जागतिक विक्रमात अहिल्यानगर जिल्ह्याचाही मोठा वाटा आहे. आजच्या जागतिक विक्रम सोहळ्यात अहिल्यानगरच्या शेतकऱ्याची प्रातिनिधिक स्वरूपात निवड होऊन साक्षात मुख्यमंत्र्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाल्याने जिल्ह्याचा गौरव झाला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.