मालेगाव : राज्यातील सत्तारूढ महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi government) शासन केंद्र सरकारच्या पावलावर पाऊल ठेवत विरोधकांचा आवाज दडपण्याचा, मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न करीत आहे. मालेगाव येथील मोर्चा व दंगल प्रकरणी जनता दल व एमआयएम कार्यकर्त्यांवर दाखल झालेले खोटे गुन्हे त्याचाच परिपाक असून, राज्य शासनाने हे षडयंत्र रचल्याचा आरोप जनता दलाचे सरचिटणीस तथा नगरसेवक मुश्तकीम डिग्निटी (Mushtaq dignity) यांनी मंगळवारी येथे केला.
हिंसाचार व दंगल प्रकरणी पोलिसांना शरण येण्यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप केला. श्री. डिग्निटी म्हणाले, की त्रिपुरातील मुस्लिम समाजावर होत असलेले हल्ले, तसेच प्रेषित मोहंमद पैगंबर यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने मुस्लिम समाजावर होणाऱ्या अन्याय, अत्याचाराच्या निषेधार्थ रझा ॲकॅडमी व ऑल इंडिया सुन्नी जमेतुल उलेमातर्फे पुकारलेल्या बंदला धार्मिक संघटनांसह शहरातील सर्व राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला होता.
दुपारपर्यंत बंद सुरळीत व शांततेत पार पडला. आमच्यासह सर्व धार्मिक व राजकीय नेते निवेदन देऊन आपापल्या कामकाजात व्यस्त झाले. घरी परतले. मात्र, मोर्चानंतर बंदला शहरात हिंसक वळण लागले. रॅलीत घुसखोरी केलेल्यांनी हा गोंधळ घातला असावा. मात्र, या प्रकरणी फक्त आमच्यावरच गुन्हे दाखल झाले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांवर का नाही? प्रारंभी पोलिसांनीही बंदच्या संयोजकांनी सहकार्य केल्याचे वक्तव्य केले होते. स्थानिक पोलिसांनी धैर्य व संयमाने परिस्थिती हाताळली. मात्र, राज्य शासनातर्फे दबाव आल्यानंतर विरोधकांवर दंगलीसह अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली, असा आरोप त्यांनी केला.
ते म्हणाले, १२ नोव्हेंबरला आंदोलन झाल्यानंतर पूर्वनियोजित कार्यक्रमापर्यंत देशातील आंदोलक कार्यकर्त्यांच्या होणाऱ्या गळचेपीसंदर्भात करण्यात येणाऱ्या ‘आंबेडकर की तलाश’ या उपक्रमानिमित्त आपण दौऱ्यावर गेलो होतो. बाहेर गेल्यानंतर येथे संपर्क साधला असता, असे गुन्हे दाखल झाल्याचे समजले.
पत्रकार परिषदेनंतर सायंकाळी पंचवीसहून अधिक कार्यकर्त्यांचा फौजफाटा घेऊन शक्तिप्रदर्शन करीत डिग्निटी शहर पोलिसांना हिंसाचार व दंगल प्रकरणातील गुन्ह्यात शरण आले. रात्री उशिरा शहर पोलिसांनी अटकेचे सोपस्कार पार पाडले. या गुन्ह्यातील सहा ते सात मुख्य संशयित अद्यापही फरारी आहेत. यापूर्वी पोलिसांनी विविध गुन्ह्यांत पन्नासहून अधिक कार्यकर्त्यांना अटक केली आहे. अद्यापही संशयितांच्या अटकेच्या कारणावरून शहरात राजकारण व आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत.
दोन दशकांच्या शांततेला तडा
१२ नोव्हेंबरला पुकारण्यात आलेल्या बंददरम्यान नवीन बसस्थानक परिसरात जमावाने चहा टपरी, एसटी पान स्टॉलची तोडफोड केली. सहारा हॉस्पिटल व नजीकच्या एटीएमवर दगडफेक केली. दंत रुग्णालयात तोडफोड व जाळपोळ, तसेच दगडफेक केली होती. दोन तास चाललेल्या या धुमाकुळामध्ये जमावाने पोलिसांवर केलेल्या दगडफेकीत तीन पोलिस अधिकारी, सात जवान व दोन शांतता समिती सदस्य, असे १२ जण जखमी झाले होते. सुमारे १२ लाख रुपयांच्या मालमत्तेची हानी झाली होती. त्याशिवाय दोन दशकांतील शांतता व एकात्मतेला तडा गेला. पोलिसांनी संतप्त जमाव पांगविण्यासाठी १२ अश्रुधुराची नळकांडी फोडली. रबर बुलेट व तीन मिरची सेलचा मारा केला होता.
...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.