Manikrao Kokate News: राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. नाशिक जिल्हा न्यायालयाने ही शिक्षा आज सुनावली. विद्यमान मंत्र्यांना एका जुन्या प्रकरणात शिक्षा सुनावल्याने खळबळ उडाली आहे. दहा टक्के सदनीका प्रकरणात बनावट कागदपत्र सादर केल्याने ही शिक्षा झाली आहे.
महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीचे सरकार असताना 1997 मध्ये हे प्रकरण घडले होते. तत्कालीन जिल्हा परिषद सभापती माणिकराव कोकाटे यांनी राज्य शासनाच्या मुख्यमंत्री स्वेच्छा निधीतील दहा टक्के योजनेतील सदनिका घेतली होती. स्वतः तसेच बंधू विजय कोकाटे यांच्या नावे त्यांनी दोन सदनिका घेतल्या होत्या.
या निकालाचा दुरगामी परिणाम कृषिमंत्री कोकाटे यांच्या राजकारणावर होऊ शकतो. यासंदर्भात न्यायालयाने कोकाटे यांना शिक्षेविरोधात अपिल करण्यासाठी दोन आठवड्याची मुदत दिली आहे. कृषिमंत्री कोकाटे सध्या नाशिकच्या न्यायालयात शिक्षा सुनावतांना ङजर होते. त्यांना अटक होते, की जामीन मिळतो याची उत्सुकता आहे.
शहरातील येवलेकर मळा या उच्चभ्रू परिसरातील नागरी कमाल जमीन धारणा कायदा अंतर्गत अतिरिक्त जमिनीवर हे बांधकाम करण्यात आले होते. त्यामध्ये केवळ आर्थिक दुर्बल आणि घर नसलेल्या व्यक्ती अशी पात्रता आहे. त्यासाठी कोकाटे बंधूंनी बनावट पुरावे सादर करून आर्थिक दुर्बल असल्याचे शासनाला सांगितले होते.
यामध्ये शासनाची फसवणूक झाल्याची तक्रार तत्कालीन आमदार आणि श्री कोकाटे यांचे राजकीय विरोधक (कै) तुकाराम दिघोळे यांनी केली होती. दिघोळे यांनीच या प्रकरणाचा प्रदीर्घ काळ पाठपुरावा केला होता. सिन्नर तालुक्याच्या राजकारणात कोकाटे विरुद्ध दिघोळे असे गट आहे.
विशेष म्हणजे तत्कालीन राज्यमंत्री दिघोळे यांनीच कोकाटे यांना सदनीका द्यावी असे शिफारस पत्र दिले होते. त्यानंतर श्री. कोकाटे यांनी दिघोळे यांच्या विरोधात राजकारण केल्याने त्यांनीच त्याची चौकशी करण्याचे पत्र देखील दिले होते. याबाबत शासनाने आदेश दिल्यानंतर अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत चौकशी आणि पुरावे गोळा केले होते. विविध कार्यकर्ते तसेच नागिरकांच्या साक्ष नोंदविण्यात आल्या होत्या. त्यानंतर राज्य शासनातर्फे सरकारवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.
या प्रकरणाची सुनावणी आज जिल्हा न्यायालयात झाली. यामध्ये माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना प्रत्येकी दोन वर्ष कारावास आणि ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या निर्णयाने जिल्ह्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
महायुतीच्या आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील सदस्याला शिक्षा झाली आहे. त्याचे दूरगामी परिणाम महायुतीच्या सरकारवर होऊ शकतात. या संदर्भात मुख्यमंत्री काय निर्णय घेतात, याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे. या शिक्षेमुळे आधीच धनंजय मुंडे प्रकरणाने अडचणीत आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे.
येवलेकर मळ्यातील या दोन्ही सदनिका श्री कोकाटे यांनी एकत्र केल्याचे बोलले जाते. सध्या तेथे व्यावसायिक वापर देखील होत आहे. माको दूध डेअरीचे व्यावसायिक कार्यालय येथे थाटण्यात आले आहे. आर्थिक दुर्बल असल्याचे खोटे पुरावे सादर करणे आमदार कोकाटे यांना अंगलट आले आहे. वीस वर्षांनी याबाबतचा निकाल आला आहे. त्यामुळे कोकाटे समर्थकांना हा मोठा धक्का मानला जातो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.