Nashik News: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माणिकराव शिंदे यांनी येवला मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शिंदे यांनी मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्या पाठीत खंजीर खुपसला. त्याचा हिशेब घेण्याची ही निवडणूक असल्याचे सांगितले.
श्री शिंदे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी मोठे शक्ती प्रदर्शन केले. विविध घटकातील मतदार त्यात सहभागी झाले होते. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे संपर्क नेते जयंत दिंडे, खासदार भास्कर भगरे, माजी आमदार मारोतराव पवार, विठ्ठल शेलार, शिवा सुराशे, सोनिया होळकर, योगेश सोनवणे, सुभाष निकम आदींसह महायुतीचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर श्री शिंदे यांनी सभेला संबोधित केले. यावेळी ते म्हणाले, येवला मतदार संघातील ही निवडणूक जातीपातीची किंवा जातीयवादाची नाही. या निवडणुकीत शरद पवार यांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या आणि महायुतीत काय चालू आहे, हे बघायला जातो असे सांगून फसवणाऱ्या मंत्री छगन भुजबळ यांचा हिशेब घेण्याची निवडणूक आहे.
या मतदारसंघात गेल्या वीस वर्षात ठोस कोणतीही कामे झाली नाही. एक रुपयाचं काम झालं असेल तर ७० ते ७५ टक्के रक्कम कुठे गेली याचा पत्ता लागलेला नाही. सबंध तालुक्यात फक्त दहा- वीस लोकं मोठे करण्याचे काम भुजबळ यांनी केले.
ते म्हणाले, मंत्री छगन भुजबळ यांनी माझा उल्लेख करीत, मला मित्र म्हटले. सहकारी असल्याचा उल्लेख केला. मात्र त्यांनी मला शुभेच्छा दिल्या नाही. मी मात्र त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत आहे. येवल्यात या दिवाळीच्या त्यांना शेवटच्या शुभेच्छा असतील.
येवल्याची ही निवडणूक जनतेने हाती घेतली आहे. जनताच निवडणुकीत काय करायचं? तो फैसला करणार आहे. जनतेने भुजबळ यांना पराभूत करण्याचा निर्णय घेतला असेल. याविषयी माझ्या मनात अजिबात शंका नाही.
या देशात अनेक मोठे मोठे नेते पराभूत झालेले जनतेने पाहिले आहेत. त्यामुळे भुजबळांचा पराभव झाल्यास फार काही घडले, असे होणार नाही. या निवडणुकीत मी चांगल्या मतांनी विजयी होणार आहे.
मंत्री भुजबळ यांनी मराठा समाजाविषयी अत्यंत अभद्र भाषा वापरली. मराठा समाजाचा वारंवार अपमान करण्याचा प्रयत्न केला. मराठा समाजाला जे बेइज्जत केले आहे. त्यात केवळ आपली राजकीय पोळी भाजणे हाच त्यांचा उद्देश होता.
मंत्री भुजबळ यांनी जाती-जातीत भांडणे लावली आहेत. यामध्ये कोणत्याही समाजाविषयी चांगली भावना त्यांच्या मनात नाही. केवळ राजकीय स्वार्थ साधने हाच त्यांचा उद्देश आहे. त्याचे उत्तर यंदाच्या विधानसभा निवडणुकीत येवल्यातील सर्व जाती धर्माचे लोक त्यांना देतील. याबाबत माझ्या मनात कोणतीही शंका नाही.
येवला मतदार संघाच्या यंदाच्या निवडणुकीत मनोज जरांगे पाटील हा फॅक्टर महत्त्वाचा असणार आहे. जरांगे पाटील बुधवारी आपली भूमिका जाहीर करणार आहेत. यावेळी ते येवला मतदारसंघाबाबत काय भूमिका घेतात, याला देखील विशेष महत्त्व आहे. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने माणिकराव शिंदे यांनी भुजबळ यांच्यावर केलेल्या आरोपांनी राजकारण चांगलेच तापणार याची प्रचिती आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.