Bhujbal Vs Jarange Patil: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दौरा सुरू केला आहे. या दौऱ्यात त्यांनी आगामी विधानसभा निवडणूक हे टार्गेट ठेवले आहे. त्यामुळे काही नेत्यांची चांगलीच कोंडी होण्याची शक्यता आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी सोलापूर येथील आपल्या दौऱ्यात विधानसभा निवडणुकीवर भाष्य केले. या संदर्भात त्यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना टार्गेट केले. त्यामुळे अनेक उमेदवार जरांगे पाटील यांच्या घोषणेने सावध झाले आहेत.
राज्यातील ओबीसी नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) मंत्री छगन भुजबळ आणि जरांगे पाटील यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. आता जरांगे पाटील यांनी जो उमेदवार श्री भुजबळ यांना प्रचाराला बोलवेल त्याचा पराभव करा, असा संदेश दिला आहे.
जरांगे पाटील यांच्या भूमिकेमुळे मंत्री भुजबळ यांची चांगलीच कोंडी होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात देखील मोजक्या नेत्यांनीच श्री. भुजबळ यांना प्रचार सभेसाठी पाचारण केले होते. तो अनुभव पाहता, विधानसभा निवडणुकीत अनेक उमेदवारांची कोंडी होण्याची चिन्हे आहेत.
मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाविरोधात आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे या समाजातील गोरगरिबांचे नुकसान होत आहे. त्यामुळे या प्रश्नावर समाजाला गंभीर होऊन विचार करावा लागेल. असे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
त्यासाठी मराठा समाजाने आरक्षणाच्या आपल्या आंदोलनात अडथळे आणणाऱ्या आणि समाजाचे नुकसान करणाऱ्या नेत्यांना डोळ्यापुढे ठेवावे. जो उमेदवार भुजबळ यांना प्रचाराला नेईल, त्याला मतदान करू नका, असे जरांगे पाटील यांनी जाहिर केले आहे. त्याचा अनेक उमेदवारांना फटका बसु शकतो.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माढा मतदारसंघात श्री भुजबळ यांना प्रचाराला नेले होते. त्याचाही जरांगे पाटील यांनी उल्लेख केला आहे. यापुढे असे घडल्यास त्या मतदारसंघातही वेगळा विचार करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.
सध्या जरांगे पाटील यांची मराठा आरक्षणासंदर्भात शांतता रॅली सुरू आहे. या कालावधीत ते राज्यातील विविध भागांना भेट देणार आहेत. याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसची (अजित पवार) आजपासून नाशिक येथून जन सन्मान यात्रा सुरू होत आहे. यामध्ये त्यांच्या पक्षाचे सर्वच मंत्री सहभागी होणार आहेत. त्यात भुजबळ असतीलच.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार गटाच्या आमदारांसह विविध मतदारसंघात विधानसभा निवडणुकीचा हा प्रचार दौरा होईल. जरांगे पाटील यांच्या इशाऱ्याने उपमुख्यमंत्री पाटील पवार यांच्या दौऱ्यावर फारसा परिणाम होणार नाही. मात्र इच्छुक उमेदवारांना जरांगे पाटील यांच्या इशाऱ्याने धडकी भरली आहे.
आगामी निवडणूक महायुतीत सहभागी झालेल्या आमदारांसाठी आणि विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाशी बंडखोरी करणाऱ्या नेत्यांना अतिशय आव्हानात्मक आहे. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते जरांगे पाटील यांनी एकाच दगडात ओबीसी नेते छगन भुजबळ यांची कोंडी केली तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अडचण केली आहे.
--------
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.