Nashik News : नाशिक येथील शिवतीर्थ येथून हजारो मराठा समाज बांधव शेकडो वाहनांच्या ताफ्यासह पुण्याकडे रवाना झाले आहेत. मुंबईत दाखल होणाऱ्या समाज बांधवांना दोन वेळ अन्न पुरविण्याची जबाबदारी नाशिक सकल मराठा समाजाने घेतली आहे आणि हा शिधा पुण्याकडे रवाना झाला.
मात्र, आजही अन्नधान्य मदतीचा ओघ सुरू आहे. मुंबईसाठी सोबत घेतलेला शिधा पुरेल, असा विश्वास समाज बांधवांना आहे. त्यामुळे आता यापुढे जमा झालेला शिधा मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी आत्महत्या केलेल्या युवकांच्या कुटुंबियांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बुधवारी सकाळी मराठा समाज बांधव ऐतिहासिक लढ्यासाठी घोषणाबाजी देत पुण्याकडे निघाले होते. लढेंगे जितेंगे हम सब जरांगे, कोण म्हणता देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, छत्रपती शिवाजी महाराज की जय, एक मराठा लाख मराठा, एकच वारी मुंबईवर स्वारी अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. शिवस्मारक ते मुंबई नाका या दरम्यान रॅली काढण्यात आली. यानंतर शेकडो वाहनांचा ताफा पुण्याकडे रवाना झाला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक करण गायकर यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. जरांगे पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे राज्य सरकारने पावले उचलली तरच हे वादळ थांबू शकते, असे गायकर म्हणाले. नानासाहेब बच्छाव म्हणाले की नाशिकमधून हजारो किलोचे तांदळाचे कट्टे, शेकडो लिटर तेलाचे डबे, डाळ, शेंगदाणे यांसह अन्य अन्नधान्याची रसद घेऊन नाशिकमधील मराठे हे पुण्याकडे रवाना होत आहे. राज्य सरकारने आता आमचा अंत पाहू नये.
दरम्यान, माजी नगरसेवक शिवाजी सहाणे यांनी सांगितले की, आज आमच्याकडे तांदूळ, तेल, शेंगदाणे, साखर असा मिळून जवळपास चार आयशर ट्रक इतका अन्नधान्य साठा आहे. हा शिधा फक्त नाशिक शहर आणि दिंडोरी, कळवण तसेच सटाणा या तीन तालुक्यांचा आहे. उर्वरीत तालुक्यांमधील मदत एकतर मुंबईकडे रवाना झाली आहे किंवा होणार आहे. नाशिकप्रमाणेच इतर जिल्ह्यातून शिधा येणार आहे. त्यामुळे आगामी काळात यातून दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न सुटेल. मात्र, अजुनही मदतीच ओघ सुरू आहे.
नाशिक शहरात दोन मंगल कार्यालयांमध्ये मदत जमा होते आहे. मराठ्यांच्या आरक्षणाची मागणी हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. त्यातून काही युवकांनी आत्महत्या केल्याच्या दुर्दैवी घटना घडल्यात. आता जमा होणारी मदत सदर युवकांच्या कुटुंबियांना देण्यात येईल, असे सहाणे यांनी स्पष्ट केले.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.