जळगाव : चोपडा विधानसभा मतदारसंघाच्या शिवसेनेच्या आमदार लता चंद्रकांत सोनवणे (Lata Sonawane) यांची आमदारकी जाण्याची दाट शक्यता आहे. कारण त्यांनी सादर केलेले जात प्रमाणपत्रच अवैध असल्याचा निर्णय नंदुरबारच्या अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीने दिला आहे. तसेच अमळनेरचे उपविभागीय अधिकाऱ्यांनी सोनवणे यांचे निर्गमित केलेले टोकरे कोळी हे अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र रद्द करण्याचे आदेश देखील या समितीने दिले आहेत. त्यामुळे आमदार लता सोनवणे यांची आमदारकी धोक्यात आली आहे.
विशेष म्हणजे लता सोनवणे यांच्या विरोधात महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचेच माजी आमदार जगदीश रमेश वळवी व अर्जुनसिंग दिवाणसिंग वसावे यांनी तक्रार दिली होती. आमदार लता सोनवणे यांचा टोकरे कोळी, अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र अवैध असल्याची तक्रार नंदुरबार येथील जातपडताळणी समितीकडे केली होती.
चोपडा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार लता चंद्रकांत सोनवणे यांनी टोकरे कोळी या अनुसूचित जमाती तपासणीचा प्रस्ताव जळगाव शहर महापालिकाच्या कार्यालय अधीक्षकांमार्फत निवडणूक प्रयोजनार्थ १० एप्रिल २०१९ ला समितीस सादर केला होता. त्यानंतर त्यांचा हा दावा समितीने ४ नोव्हेंबर २०२० रोजी अवैध घोषित केला होता. मात्र समितीच्या आदेशाविरुद्ध आमदार सोनवणे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात रिट याचिका दाखल केली होती. त्यावर खंडपीठाने ३ डिसेंबर २०२० ला निर्णय देता समितीचा आदेश रद्दबातल करून आमदार सोनवणे यांना अमळनेर उपविभागीय अधिकाऱ्यांकडून नव्याने जात प्रमाणपत्र प्राप्त करून ७ दिवसांच्या आत प्रस्ताव सादर करण्याबाबत निर्देश दिले होते. तसेच हे प्रकरण ४ महिन्यांत निकाली काढण्याबाबत समितीस निर्देश दिले.
उच्च न्यायालयाच्या या निर्देशांनुसार आमदार सोनवणे यांनी नव्याने जातीचे प्रमाणपत्र प्राप्त करून समितीला ९ डिसेंबर २०२० ला नव्याने प्रस्ताव सादर केला. मात्र हा प्रस्ताव दाखल करताना पूर्वीच्या पुराव्यांव्यतिरिक्त नवीन अधिकचे पुरावे प्रस्तावासोबत सादर केल्याने पुराव्यांची सत्यता पडताळणी करणे आवश्यक असल्याने प्रकरण पोलिस दक्षता पथकाकडे सखोल चौकशीसाठी वर्ग करण्यात आले होते. पोलिस दक्षता पथकाने चौकशीची कार्यवाही पूर्ण करून चौकशी अहवाल समितीस २० मे २०२१ ला प्राप्त झाला.
समितीला प्राप्त झालेल्या अहवालावरून आमदार सोनवणे टोकरे कोळी अनुसूचित जमातीचा दावा सिद्ध करू शकलेल्या नाहीत. म्हणून लता सोनवणे यांचा टोकरे कोळी, अनुसूचित जमातीचा दावा अवैध घोषित करण्यात आला असल्याचा निर्णय नंदुरबारच्या अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीने दिला आहे. त्यामुळे आमदार सोनवणे यांनी सादर केलेले आणि अमळनेरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी निर्गमित केलेले टोकरे कोळी, अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र रद्द करून त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) अधिनियम, २००० च्या कलम १० व ११ अन्वये उचित कारवाई करण्यात यावी व केलेली कारवाई या कार्यालयास अवगत करावी, असे आदेश समितीने दिले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.