BJP Nashik News : अन्नसुरक्षा कायद्याचा व्यावसायिकांना मोठा त्रास असून त्यामध्ये बदल करवा, अशी मागणी व्यापारी आणि व्यावसायिकांच्यावतीने करण्यात आली आहे. याबरोबरच एपीएनसी कायद्यामुळे व्यावसायिकांसह ग्राहकांनाही मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे तो कायदा सुटसुटीत करण्यात यावा, अशी मागणी आज भाजपतर्फे पार पडलेल्या व्यापारी संवाद संमेलनात विविध व्यापारी आणि व्यावसायिकांनी केली आहे.
व्यापारी आणि व्यावसायिकांच्या या मागणीवर ग्रामविकास व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी त्यांना आश्वासन देत सर्व प्रश्न लवकरच सोडविले जातील, अशी ग्वाही दिली. त्यामुळे येत्या काळात व्यापाऱ्यांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
यावेळी मंत्री महाजन म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नऊ वर्षांच्या कार्यकाळात देशाचा सर्वांगीण विकास झाला आहे. पंतप्रधानांच्या दूरदृष्टीने व अनेक क्रांतिकारी निर्णयांनी शेतकरी, सामान्य माणूस, उद्योजक, विद्यार्थीवर्गात समाधानाचे वातावरण आहे. आज जगात आपण अनेक क्षेत्रांत स्वयंपूर्ण झालो आहोत", असंही ते म्हणाले.
केंद्र सरकारची कामे, तसेच केंद्र सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोचविण्यासाठी राज्यभरात भाजपतर्फे जनसंपर्क अभियान सुरू आहे. त्याअंतर्गत आज सकाळी गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात भाजप महानगर व्यापारी आघाडीतर्फे व्यापारी संवाद संमेलन पार पडले. यावेळी महाजन बोलत होते. तसेच शहराध्यक्ष गिरीश पालवे यांनी केंद्र सरकारच्या नऊ वर्षांच्या काळातील विविध योजनांची माहिती देतानाच जनसंपर्क अभियानामागील भूमिका विशद केली.
प्रफुल्ल संचेती यांनी व्यापारी हा कणा असल्याचे सांगतानाच मोदी सरकारने याक्षेत्रात भरीव काम केल्याचे सांगितले. अन्नसुरक्षा कायद्याचा व्यावसायिकांना मोठा त्रास असून त्यात बदल करण्याची मागणी त्यांनी केली. एपीएनसी कायद्यामुळे व्यावसायिकांसह ग्राहकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याने तो सुटसुटीत करण्याची मागणी त्यांनी केली. भाजप नेते लक्ष्मण सावजी यांनी केंद्राच्या लोकोपयोगी योजनांचा आढावा घेतला. आमदार फरांदे यांनी भाजप व्यापाऱ्यांच्या मागे खंबीरपणे उभा असल्याचे सांगितले.
व्यावसायिकांनी प्रोफेशनल टॅक्सच्या माध्यमातून सुरू असलेली व्यापाऱ्याची लूट, केमिस्ट बांधव, महापालिकेचे गाळेधारक व्यावसायिक, बी-बियाणे व खत विक्रेते, किरकोळ व घाऊक धान्य व्यापारीवर्गाचे विविध प्रश्न मंत्री महाजन यांच्यासमोर मांडत न्यायाची अपेक्षा केली. त्यावर यासर्व प्रश्नांवर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय
महाजन यांनी केंद्राच्या कामगिरीबाबत बोलताना गत नऊ वर्षांत देशातील वैद्यकीय क्षेत्रातही मोठी क्रांती झाल्याचे सांगितले. आगामी काळात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणार असल्याचे सूतोवाचही त्यांनी केले. यावेळी आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, ॲड.राहुल ढिकले, भाजप नेते लक्ष्मण सावजी, विजय साने, माजी महापौर सतीश कुलकर्णी, व्यापारी आघाडीचे शशिकांत शेट्टी, प्रफुल्ल संचेती, प्रदीप पेशकार, कुणाल वाघ आदी उपस्थित होते.
Edited By : Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.