

Nashik News : म्हाडा सदनिका 900 कोटींचा घोटाळ्याची व्याप्ती मोठी आहे. राज्य शासनाने महसूल आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली तपास पथक नियुक्त केले आहे. या पथकाने कारवाईचा धडाका लावला आहे. दोनच दिवसापूर्वी महसूल विभागातील चार तलाठ्यांना निलंबित करण्यात आले होते. आता भूमि अभिलेखा विभागातील एकाच वेळी 9 जणांना निलंबित करण्यात आले आहे.
विधिमंडळ अधिवेशनात म्हाडा आणि महापालिका यांच्या संगनमताने सुमारे 900 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप झाला होता. बांधकाम व्यावसायिकांनी आर्थिक दुर्बल घटकांना सदनिका देणे अपेक्षित होते. मात्र त्या सदनिकांची खुल्या बाजारात विक्री केली.
म्हाडाच्या प्रशासनाने या सदनिकांसाठी बिल्डर लॉबीला आशीर्वाद देत एनओसी दिली. महापालिकेने त्यांचे प्लॅन मंजूर केले. महसूल विभागाने नियम बाजूला ठेवून चुकीच्या नोंदी करीत खाते फोड केली. भूमी अभिलेख विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यात सहकार्य केले.
भूमी अभिलेख कार्यालयातील शिरस्तेदार मनोज शिवदे आणि प्रशांत अडांगळे, भूमापक पर्यवेक्षक सोमकात जैन, अभिलेखपाल दीपक गांगुर्डे तसेच नरेश कांबळे, राजेश वाडकर आणि सोमनाथ सानप, प्रतिलिपी लिपिक निलेश कापसे व दप्तर बंद चंद्रकांत घोडेले यांना निलंबित केले आहे.
निलंबनाची कारवाई केलेल्या या कर्मचाऱ्यांना कोणत्याही शासकीय कामकाजात भाग घेता येणार नाही. त्यासाठी त्यांना परजिल्ह्यातील कार्यालयात हजेरी लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. काहींना जिल्ह्यातील अन्य तालुक्यात हजेरी लावण्याची सक्ती करण्यात आली आहे. अशा प्रकारची कारवाई पहिल्यांदाच झाल्याचे बोलले जाते.
एकाच वेळी अनेक विभागांना हाताशी धरून गैरप्रकार करण्याचा बांधकाम व्यवसायिकांचा हा मोठा गैरप्रकार उघड झाला. त्यात शासनाच्या योजनेनुसार एक एकर पेक्षा अधिक क्षेत्रावरील बांधकामात 20 टक्के सदनिका आर्थिक दुर्बळ घटकांना न देता खुल्या बाजारात विक्री झाल्या.
या प्रकरणात दोन दिवसांपूर्वी आयुक्त गेडाम यांनी तीन तलाठ्यांसह एका महिला कर्मचाऱ्याला निलंबित केले होते. पाठोपाठ गुरुवारी कारवाईचा बडगा भूमि अभिलेख विभागावर पडला. येथील 9 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
महसूल कर्मचाऱ्यांना पाठोपाठ भूमि अभिलेख कार्यालयाला या कारवाईचा दणका बसला आहे. नाशिक महापालिकेतील नगररचना विभागातील दोन वरिष्ठ अधिकारी यापूर्वीच निलंबित झाले आहेत. म्हाडा घोटाळ्यातील कारवाईची व्याप्ती वाढत असल्याने अनेकांनी त्याचा धसका घेतला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.