

Nashik Politics : त्र्यंबकेश्वर देवस्थान पाठोपाठ आता नाशिकमधील प्रसिद्ध श्री काळाराम मंदिर विश्वस्त मंडळही शासनाच्या रडारवर आले आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंचवटीतील श्री काळाराम संस्थानच्या विश्वस्त मंडळाची चौकशी करून ते बरखास्त करावे, असे आदेश राज्य शासनाने मुंबईच्या धर्मादाय उपायुक्तांना दिले आहेत.
यासंदर्भात नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲड. राहुल ढिकले यांनी विश्वस्त मंडळातील काही सदस्यांच्या कारभाराबाबत आक्षेप घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. काही सदस्यांच्या मनमानी कारभारामुळे मंदिराची प्रतिमा मलिन होत असल्याची तक्रार करत आमदार ढिकले यांनी हे मंडळच बरखास्त करण्याची मागणी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली होती. याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी तत्काळ चौकशीचे आदेश दिले.
आमदार ढिकले यांनी २५ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं होतं. त्यात श्री काळाराम मंदिर संस्थानचे दोन विश्वस्त शुभम मंत्री व मिलिंद तारे हे इतर विश्वस्तांना विश्वासात न घेता दमदाटी करुन परस्पर निर्णय घेत असल्याचा आरोप करत, मंदिरातील वंशपरंपरागत पुजारी वर्गाला तसेच काही विश्वस्तांना मानसिक त्रास देत असल्याचे म्हटले होते.
आमदार ढिकले यांनी सध्याचे विश्वस्त मंडळ बरखास्त करून नवीन विश्वस्त मंडळाची नियुक्ती करण्याची मागणी केली होती. यावर मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार विधी व न्याय विभागाने मुंबईच्या धर्मादाय उपायुक्त कार्यालयाला पत्र देत विद्यमान विश्वस्त मंडळाची चौकशी करुन कारवाई करण्याचे आदेश दिले आहे.
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर देवस्थानमध्ये चालणाऱ्या व्हीआयपी दर्शन काळाबाजार रॅकेटमध्ये विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांचा सहभाग असल्याचे तपासात समोर आल्याने त्र्यंबकेश्वर देवस्थानचे विश्वस्त मंडळही शासनाच्या रडारवर आहे. कडलग हे आपल्या दोन पुतण्यांच्या मदतीने हे काळाबाजाराचे साम्राज्य चालवत होते. व्हिआयपी दर्शनाच्या नावाखाली भाविकांकडून हजारो रुपयांना अवैधपणे तिकीटांची विक्री केली जात होती. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या त्र्यंबकेश्वर व श्री काळाराम मंदिराचे विश्वस्त मंडळ आता शासनाच्या रडावर आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.