Nagar crime News : राहुरीतील राजाराम आणि त्यांची पत्नी मनीषा आढाव या वकील दाम्पत्याच्या हत्येनंतर राज्यभरातील वकिलांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. राहुरीमध्ये वकिलांनी तहसील कार्यालयावर मोर्चा नेत नगर जिल्ह्यातील सर्व वकील संघटनांनी तीन फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कामकाजा सहभागी न होण्याबरोबर साखळी उपोषणाचा निर्णय जाहीर केला. हत्याकांडाचा तपास सीआयडीकडे देण्याबरोबरच आरोपींची नार्को चाचणी करण्याची मागणी केली.
राहुरीतील वकील आढाव दाम्पत्याची सराईत गुन्हेगारांच्या टोळीने निर्घुणपणे हत्या केली. या हत्येचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले आहेत. या हत्येचा निषेध नोंदवण्यासाठी राहुरी न्यायालयाच्या आवरातून वकिलांनी मोर्चा काढला. नगर जिल्हा वकील संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चाचे तहसील आवारात सभेत रूपांतर झाले. माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे (Prajkat Tanpure) हे देखील मोर्चात सहभागी झाले.
वकील संरक्षण कायद्याची वकील संघटनेचे मागणी न्याय असून सरकारकडे यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन आमदार तनपुरे यांनी यावेळी दिले. राजकारणाचे गुन्हेगारीकरण मोठ्या प्रमाणात होते आहे. राजकारण्यांनी गुन्हेगारांना संरक्षण देणे बंद केले पाहिजे. आपण या घटनेत आढाव कुटुंब यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असेही आमदार तनपुरे यांनी सांगितले. आरोपींची नार्कोटेस्ट व्हावी. प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात यावा, अशी वकिलांनी यावेळी मागणी केली.
वकील संरक्षण कायद्याचा लढा व्यापक करण्याचे यावेळी ठरवण्यात आले. तीन फेब्रुवारीपर्यंत राहुरीसह नगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील वकिलांनी न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकण्याचे यावेळी निश्चित करण्यात आले. तोपर्यंत न्यायालयाच्या आवारात वकील संघटनांचे सदस्य साखळी उपोषण करणार आहेत. तहसीलदार पूनम दंडले यांना वकील संघटनांच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
वकील आढाव दाम्पत्याची हत्या ही दुर्दैवी घटना आहे. पोलिसांची कारवाई योग्य दिशेने चालू आहे. गुन्हेगारांचे बळ वाढू नये. गुन्हेगारांविरुद्ध कडक कारवाई व्हावी, यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्याबाबत पोलिसांना विशेष सूचना देण्यात आले असल्याची माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishn vikhe) यांनी दिली. वकील आढाव कुटुंबियांचे सांत्वनपर सोमवारी मंत्री विखे यांनी मानोरीत भेट घेतली.
गुन्ह्यातील पाचही आरोपींना राहुरी पोलिसांनी अटक केली आहे. त्या आरोपींनी न्यायालयात गुन्ह्याची माहिती दिली आहे. माफीचा साक्षीदार होण्याची देखील तयारी दर्शविली आहे. तपास यंत्रणा योग्य पद्धतीने काम करीत आहेत. त्यातून सत्य काय ते बाहेर येईलच, असेही मंत्री विखे यांनी म्हटले. या हत्याकांडमध्ये एक आरोपी सराईत गुन्हेगार असून यापूर्वीच्या दोन गंभीर गुन्ह्यात तो निर्दोष कसा सुटला याबाबत फेरचौकशी करण्याचा आदेश देण्यात आल्याचेही मंत्री विखे यांनी सांगितले.
(Edited by - Sachin waghmare)