Lok Sabha Election 2024: मतदानाचा टक्का दोनदा बदलला; नगर जिल्हा प्रशासनाभोवती 'संशयकल्लोळ...'

Nagar Lok Sabha Election 2024 : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील मतदानाच्या आकडेवारीत बदल झाला आहे. नगर जिल्हा प्रशासनाने मंगळवारी 11 तासांच्या फरकाने दोनदा बदल झाल्याची आकडेवारी जाहीर केली. यानुसार 66.61 टक्के मतदान झाले आहे.
Nagar Dakshin Lok Sabha 2024
Nagar Dakshin Lok Sabha 2024Sarkarnama

Nagar Lok Sabha Election: नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात (Nagar Dakshin Lok Sabha Constituency) तणावात सोमवारी मतदान झाले. प्रशासन मतदान निकोपपद्धतीने पार पाडण्यात कमी पडले. अशातच आता मतदानाचा नवीन आकडा प्रशासनाने जाहीर केल्याने कार्यपद्धतीवर संशय बळावला आहे. तशा चर्चादेखील मतदारसंघात सुरु झाल्या आहेत. नगरचे मतदान सोमवारी झाले. प्रशासनाने सुरूवातीला दिलेल्या आकडेवारीत मंगळवारी सकाळी बदल झाला. यानंतर नगर जिल्हा प्रशासनाने मंगळवारी दोनदा 11 तासांच्या फरकाने बदल झाल्याचे सांगत आकडेवारी जाहीर केली. यानुसार नगर दक्षिण लोकसभा (Lok Sabha) मतदारसंघात विक्रमी 66.61 टक्के मतदान झाले आहे. मतदानाचा वाढलेला टक्का संशयाचा आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा ठरला आहे.

नगर दक्षिण लोकसभेसाठी (Lok Sabha) सोमवारी मतदान झाले. मतदान पार पडल्यावर प्रशासनाने दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी 11 वाजता मतदान क्षेत्रात 63.77 टक्के मतदान झाल्याचे जाहीर केले. यानंतर पुन्हा 11 तासांनी नवीन आकडेवारी जाहीर केली. या आकडेवारीनुसार नगर दक्षिण मतदारसंघात 66.61 टक्के मतदान झाल्याचे प्रशासनाने जाहीर केले. अगोदरपेक्षा या आकडेवारीत तब्बल 2.84 टक्के म्हणजेच, 56 हजार 387 मते वाढली आहेत. हा वाढलेला टक्का संशय वाढवू लागला आहे. दरम्यान, शिर्डी मतदारसंघात मागीलवेळच्या तुलनेत 1.90 टक्के कमी मतदान झाले. तिथे मात्र नगरप्रमाणे दोन वेगवेगळे आकडे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले नाहीत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नगर मतदारसंघात 2019 च्या निवडणुकीपेक्षा 1 टक्का कमी तर, शिर्डीत सुमारे 4 टक्के कमी मतदान झाल्याची प्राथमिक आकडेवारी नंतर स्पष्ट झाली. मतदानाचा घसरलेला हा टक्का उमेदवारांना फायद्याचा ठरेल की फटका देईल, अशी चर्चा होती. परंतु आता नव्या आकडेवारीनुसार मतदानाचा टक्का वाढला आहे. तो कोणाला तारक आणि मारक आहे, हे मतमोजणीनंतरच स्पष्ट होईल. दरम्यान, प्रशासनाने जाहीर केलेली शिर्डी आणि नगर (Shirdi and Nagar) मतदारसंघांची आकडेवारी प्रत्यक्षात मतमोजणीवेळी जुळते की नाही, हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

नगर लोकसभा मतदारसंघात अंदाजे सरासरी एकूण 61 टक्के आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघात अंदाजे सरासरी 62 टक्के मतदान झाल्याचे सोमवारी सायंकाळी मतदानाची वेळ संपल्यावर जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर मंगळवारी (14 मे) सकाळी 11 वाजता नगर लोकसभा मतदारसंघाची आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार 63.77 टक्के मतदान झाल्याचे स्पष्ट केले. शिर्डी लोकसभा मतदारसंघाची आकडेवारी दुपारी साडेतीनला जाहीर केली. त्यानुसार तेथे 63.03 टक्के मतदान झाल्याचे सांगितले गेले. मात्र रात्री 9.50 च्या सुमारास नगर लोकसभा मतदारसंघाची सुधारित आकडेवारी जाहीर केली. यानुसार या मतदारसंघात 66.61 टक्के, असे विक्रमी मतदान झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आलं.

नगर दक्षिणमध्ये 56 हजारावर मते वाढली

जिल्हा प्रशासनाच्या 11 तासात जाहीर झालेल्या दोन आकडेवारीनुसार तब्बल 56 हजार 387 मते वाढल्याचे स्पष्ट झाले. यामध्ये शेवगावला 1 हजार 47, राहुरीला 670, पारनेरला 20 हजार 990, नगर शहरात 14 हजार 795, श्रीगोंद्याला 17 हजार 616 व कर्जत-जामखेडला 1 हजार 269 मते वाढली. यात पारनेर, नगर व श्रीगोंदे या तीन तालुक्यात वाढलेली मते आश्चर्यकारक मानली जात आहे. विदर्भातील अंतिम आकडे निवडणूक आयोगाकडून 8-10 दिवसांनी आल्यावर त्यावर राजकीय नेते मंडळींकडून संशय व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून नगर दक्षिणचे दोन वेळा मतदानाचे आकडे आले आहेत, तर शिर्डची आकडेवारी एकदाच आली आहे.

Nagar Dakshin Lok Sabha 2024
Maval Lok Sabha Analysis: मावळ शिवसेनेचाच! पण, शिंदेंचा की ठाकरेंचा?

विधानसभा मतदारसंघानिहाय मतदान

जिल्हा प्रशासनाच्या दोन्हीही आकडेवारीनुसार यंदा नगर शहर विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे, 62.50 टक्के मतदान झाले. सर्वाधिक 70.13 टक्के मतदान पारनेरला झाले. याशिवाय शेवगावला 63.03 टक्के, राहुरीला 70.00 टक्के, श्रीगोंद्यात 67.90 टक्के आणि कर्जत-जामखेडला 66.19 टक्के मतदान झाले. नगर दक्षिणमध्ये 19 लाख 81 हजार 866 एकूण मतदार होते. यापैकी 10 लाख 32 हजार 946 पुरुष व 9 लाख 48 हजार 801 महिला मतदार होते. अंतिम मतदान आकडेवारीत 7 लाख 21 हजार 327 पुरुषांनी व 5 लाख 98 हजार 790 महिला मतदारांनी मतदान केले. यात 69.83 टक्के पुरुषांनी तर 63.11 टक्के महिलांनी मतदानात भाग घेतला.

(Edited By Jagdish Patil)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com