Lok Sabha Election 2024: दहशतवाद, सीमेबाहेरून ट्विट, मुस्लिमांना आरक्षण; PM मोदींनी व्यक्त केली भीती

PM Narendra Modi On India Alliance: भाजप मित्रपक्षाच्या सरकारने गेल्या वर्षात देशात गरिब कल्याण, राष्ट्रीय सुरक्षा, देशाचा स्वाभिमान, सन्मान यावर काम केले. याबाबत काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष यावर बोलू शकत नाहीत.
PM Narendra Modi On India Alliance
PM Narendra Modi On India AllianceSarkarnama

PM Narendra Modi News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नगरच्या सभेत देशातील इंडिया आघाडी आणि राज्यातील महाविकास आघाडीविषयी भीतीदायक चित्र उभे केले. "देशातील लोकसभा निवडणुकीला समोरे जाताना काँग्रेस (Congress) पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाला क्लिन चीट देत आहे. निवडणुकीसाठी देशाच्या सीमेबाहेरून काँग्रेसच्या समर्थनात ट्विट सुरू झाले आहेत, असा गंभीर आरोप करत देशातील एसटी, एससी, ओबीसी आणि इतर सामान्य गरीब समाजाचे आरक्षण काढून मुसलमानांना संपूर्ण आरक्षण दिले जाईल. यासाठी धर्माच्या आधारावर संविधान बदलले जाऊ शकते", अशी भीती पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी त्यांच्या भाषणातून व्यक्त केली.

देशविरोधात काँग्रेस (Congress) मोठे कटकारस्थान रचत असल्याचे सांगून महाविकास आघाडी इंडियामधील बिहारचे नेते लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांनी या कटकारस्थानावर शिक्कामोर्तब केलं असल्याचं हे पंतप्रधान मोदी यांनी लालूंचे नाव न घेता सांगितले. एसटी, एससी, (ST,SC) ओबीसी (OBC)आणि इतर समाजाचे आरक्षण काढून मुसलमानांना पूर्ण आरक्षण देणार आहे. काँग्रेस आपली व्होट बँक वाचवण्यासाठी तुष्टीकरण राजकारणाचा खेळ खेळत असल्याचा आरोपही मोदींनी (Narendra Modi) यावेळी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांनी देखील यांना रोखले होते. संविधान सभेनेही यांना रोखले होते. परंतु काँग्रेस आणि महाविकास आघाडी इंडिया हे पाप पुन्हा करत आहे. संविधानात धर्मानुसार आरक्षण देण्याची तरतूद नाही. मात्र, याच मुद्यावर इंडिया आघाडी संविधान बदलणार आहे. गरिब, महिला, युवा, ओबीसी यांनी काँग्रेसला नाकारले आहे. त्यामुळे काँग्रेस (Congress) स्वतःला सावरण्यासाठी कोणत्याही पातळीवर जाऊ शकते, असेही मोदी म्हणाले.

काँग्रेसच्या समर्थनात देशाबाहेर ट्विट

आघाडी देशात हतबल झाली आहे आणि त्यांची ही हतबलता देशाबाहेर दिसू लागली आहे. देशात ए-टीम हारली आहे. त्यामुळे काँग्रेसची देशाच्या सीमाबाहेरील बी-टीम अॅक्टीव्ह झाली आहे. देशाच्या सीमेबाहेरून काँग्रेसला समर्थन देणारे ट्विट केले जाऊ लागलेत. त्यामोबदल्यात काँग्रेस पाकिस्तानला (Pakistan) दहशतवादी हल्ल्यांमध्ये क्लिन चीट देऊ लागली आहे. राज्यातील मुंबईत 26/11 हल्ला पाकिस्तानने केला होता. या हल्ल्यात आपल्या जवानांची आणि निर्दोष लोकांची हत्या झाली होती. हा दहशतवादी हल्ला देशासह संपूर्ण जगाने पाहिला. न्यायालयाने त्यावर दोषींना शिक्षादेखील दिली. पाकिस्तानने देखील या हल्ल्यात त्यांचे देशातील दहशतवादी (Terrorist) असल्याचे सांगितले. असे असतानाही काँग्रेस दहशतवाद्यांना निर्दोष असल्याचे प्रमाणपत्र देत आहे, असंही मोदींनी म्हटलं.

काँग्रेस दहशतवाद्यांना क्लिन चीट देतंय

मोदीने (Narendra Modi) देशात दहा वर्षात सुरक्षा आणि विकास याची गॅरंटी दिली आहे. काँग्रेस त्यांच्या काळात ज्या समस्या सोडून गेली होती, त्याचे समाधान आम्ही दिलं आहे. महाराष्ट्रात काँग्रेसने शेतकऱ्यांना संकटात लोटले. काँग्रेसने फक्त लुटले. मुंबईतील दहशतवादी हल्ल्यावर राज्यातील काँग्रेसच्या नेत्याचे विधान खूपच गंभीर आहे. काँग्रेस दहशतवाद्यांची बाजू घेत आहे. काँग्रेसच्या काळात विदेश मंत्री असलेल्यांनी कसाबला निर्दोष असल्याचे सांगितले. मुंबई हल्ल्यातील शहीद आणि निर्दोष मृतांचा हा अपमान आहे. मुंबई हल्ल्यात शहीद झालेले शहीद तुकाराम ओंबळे यांचा आपमान आहे. तुष्टीकरणाच्या राजकारणात काँग्रेस खालची पातळी गाठू लागली आहे. अशी काँग्रेस आणि महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) महाराष्ट्रात एकही जागा निवडून आली नाही पाहिजे, असे आवाहन मोदींनी केले.

PM Narendra Modi On India Alliance
Lok Sabha Election 2024: यंदा महाराष्ट्र तुम्हाला दिल्लीपर्यंत पोहोचू देणार नाही, ठाकरेंचा मोदी-शहांवर हल्लाबोल

गरिबांच्या प्रश्नावर काँग्रेस तोंड लपवते

भाजप (BJP) मित्रपक्षाच्या सरकारने गेल्या वर्षात देशात गरिब कल्याण, राष्ट्रीय सुरक्षा, देशाचा स्वाभिमान, सन्मान यावर काम केले. यावर काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष बोलू शकत नाहीत. गरिब कल्याणवर चर्चा सुरू झाल्यावर शहामृगासारखे काँग्रेस जमिनीत तोंड लपवते. त्यांच्याकडे बोलायला काही नाही. काँग्रेसने 50 वर्षात गरिबी हटवण्याचे आश्वासन दिले होते. परंतु गरिबांचा विश्वासघात केला. तुलनेत आम्ही देशातील प्रत्येकासाठी योजना राबवून उत्तर दिल्यामुळे काँग्रेस तोंडावर पट्टी बांधून आहे, असा घणाघात देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी केला.

(Edited By Jagdish Patil)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com