

Nandurbar Police Salary Scam : महाराष्ट्र पोलिस दलाचे "सद्रक्षणाय खलनिग्रहणाय" हे ब्रीदवाक्य सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नाश करण्याचा संदेश देते. मात्र, नंदुरबार पोलिस दलात याच यंत्रणेतील काही कर्मचाऱ्यांवर सरकारी वेतन निधीचा कथित अपहार केल्याचा आरोप झाल्याने खळबळ उडाली आहे.
शासकीय सेवार्थ (Sevaarth) प्रणालीचा कथित गैरवापर करून तब्बल 47 लाख 60 हजार रुपयांचे अतिरिक्त वेतन मंजूर करून घेतल्याचा आरोप करण्यात आला असून, याप्रकरणी दोन वेतन लिपिकांसह सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, सन 2023 ते जून 2024 या कालावधीत पोलिस (Police) अधीक्षक कार्यालयातील वेतन लिपिक मनोज बुवा आणि महेंद्र शिंदे यांनी इतर पाच पोलिस अंमलदारांशी संगनमत केल्याचा आरोप आहे. शासकीय सेवार्थ प्रणालीत कथित फेरफार करून अतिरिक्त वेतन मंजूर करण्यात आले आणि ती रक्कम संबंधितांच्या बँक खात्यांमध्ये वर्ग करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.
तपासादरम्यान हा प्रकार दोन टप्प्यांत झाल्याचे निष्पन्न झाले असून, एकूण 47 लाख 60 हजार रुपयांचा सरकारी निधी कथितपणे अपहार झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची चर्चा पोलिस दलात काही काळापासून दबक्या आवाजात सुरू होती. अखेर अधिकृत तक्रार दाखल झाल्यानंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आले आणि नंदुरबार (Nandurbar) पोलिस दलात मोठी खळबळ उडाली.
या प्रकरणी फिर्यादी संदीप सोनवणे यांच्या तक्रारीवरून नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, संबंधित आर्थिक व्यवहार, सेवार्थ प्रणालीतील नोंदी आणि बँक खात्यांची पडताळणी केली जात आहे.
दरम्यान, या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.