Maratha Vs OBC News: मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या. त्यामुळे मराठा आणि कुणबी वर्गाला ओबीसी आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यावरून आता राज्यात ओबीसी आरक्षणावरून राजकारण तापवण्याचा प्रयत्न होत आहे.
मुंबईत आझाद मैदान येथे मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीसह अन्य पाच मागण्या मान्य झाल्या. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबाबत भूमिका बजावली. त्यामुळे मराठा आरक्षणाचे आंदोलन करणाऱ्या समर्थकांना दिलासा मिळाला आहे.
मात्र या विषयावरून आता राज्यात राजकारण तापवण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ तसेच ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी यासंदर्भात विरोध दर्शवला आहे. त्याला अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी उत्तर दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. ओबीसींच्या ताटातील भाकरी कमी न करता हा निर्णय सोडवला. यासंदर्भात मंत्री छगन भुजबळ यांचा आक्षेप असल्यास मुख्यमंत्री त्यांची समजूत काढतील, असे पाटील म्हणाले.
मराठा आरक्षणाचा निर्णय झाल्यानंतर त्यावर काही नेत्यांनी नकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्या. त्याविषयी नाराजी व्यक्त करीत नरेंद्र पाटील यांनी राज्य शासनाने चांगला निर्णय घेतला आहे असे सांगितले. मराठा समाजाला आरक्षण मिळत असेल तर इतरांच्या पोटात दुखण्याचे कारण तरी काय? कोणाची पोटदुखी असल्यास मुख्यमंत्री त्यावर उपचार करतील, या शब्दात त्यांनी मंत्री भुजबळ आणि अन्य ओबीसी नेत्यांना खडसावले आहे.
मराठा आरक्षणाबाबत शासनाने चांगला तोडगा काढून ओबीसी घटकांवर कोणताही अन्याय होऊ दिलेला नाही. काही नेते मात्र यावर ओबीसी घटकांवर अन्याय झाल्याची तक्रार करीत आहे. यावर देखील शासन उपाययोजना करील. संदर्भात ओबीसी आरक्षण उपसमिती नेमण्याची घोषणा यापूर्वीच करण्यात आली आहे.
मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत उपसमिती नियुक्त करण्यात आली होती. तशीच समिती मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली नेमली आहे. त्यात मंत्री छगन भुजबळ यांचाही समावेश करण्यात आला आहे. ओबीसी आरक्षणाबाबत काही समस्या असल्यास या समितीत चर्चा करून त्यावर तोडगा काढता येईल, असे पाटील यांनी सांगितले.
--------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.