

Nashik district court news : गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात पाच न्यायाधीशांच्या वर्तनावरून वकिलांमध्ये तीव्र असंतोष आहे. तो असंतोष शेवटी फुटला. वकिलांनी या न्यायाधीशांविरोधात, न्यायालयीन कामकाजातून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला.
नाशिक जिल्हा न्यायालयात वकिलांनी केलेल्या या आंदोलनाची चर्चा होती. हे पाच न्यायाधीश कोण? त्यांचे वर्तन काय होते? वकिलांचे म्हणणे योग्य अन् तक्रारी असेल, तर न्यायाधीशांवर काय कारवाई होणार? यावर आता चर्चा सुरू झाल्या आहेत.
नाशिकच्या (Nashik) जिल्हा व सत्र न्यायालयातील पाच न्यायाधीशांच्या वर्तनाबाबत वकिलांमध्ये तीव्र असंतोष आहे. न्यायालयीन कामकाजादरम्यान असभ्य भाषा वापरणे, अरेरावी करणे, फाईल्स फेकणे अशा स्वरूपाच्या तक्रारी या न्यायाधीशांविरोधात आहे. याबाबत वकिलांनी शहर वकील संघाकडे तक्रारी देखील केल्या होत्या. त्यानंतर संघाने प्रधान जिल्हा न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांच्याकडे तोंडी तसेच लेखी स्वरूपात तक्रारी सादर केल्या. मात्र, त्यावर कोणतीही ठोस कारवाई झाली नाही.
वकील संघाने पालक न्यायाधीश तसेच मुंबई उच्च न्यायालयातील (Court) न्यायाधीश सारंग कोतवाल यांच्याकडेही लेखी तक्रारी केल्या. तथापि, या तक्रारींवरही कोणतीही दखल घेतली गेली नसल्याचा आरोप वकील संघाने केला आहे.
या तक्रारीनंतरही संबंधित न्यायाधीशांच्या वर्तनात कोणतीही सुधारणा न झाल्याचे दिसून आल्याने, सोमवारी कामबंद आंदोलन पुकारण्यात आले. या आंदोलनामुळे दिवसभर संबंधित न्यायाधीशांच्या दालनात वकील उपस्थित राहिले नाहीत. जिल्हा न्यायालयाच्या परिसरात वकिलांनी निदर्शने केली.
दरम्यान, देशभरातील न्यायालयांमध्ये वकिली व्यवसाय करण्याची पात्रता मिळविण्यासाठी ऑल इंडिया बार कौन्सिल यांच्यातर्फे दरवर्षी परीक्षा घेतली जाते. मात्र या परीक्षेसाठी उत्तर महाराष्ट्रात कोणतेही परीक्षा केंद्र नसल्याने इथल्या युवा विधिज्ञांना मुंबई, छत्रपती संभाजीनगर तसेच इतर शहरांमध्ये जावे लागते. यामुळे वेळ व पैशांचा नाहक अपव्यय होत असून, ही गैरसोय टाळण्यासाठी आगामी परीक्षेपूर्वी नाशिकमध्येच परीक्षा केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी युवा विधिज्ञांकडून होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.