

Maithili Thakur Bhajan at Nashik Kumbh Mela : बिहारच्या अलीनगर मतदारसंघाच्या भाजप आमदार व लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूर नाशिकच्या 'कुंभ भक्ती संगम' कार्यक्रमात दिसणार आहेत. मैथिली ठाकूर यांचा २९ ऑगस्ट रोजी नाशिकच्या ठक्कर डोम येथे भजनाचा कार्यक्रम होणार आहे.
सुप्रसिद्ध लोकगायिका असलेल्या मैथिली ठाकूर यांनी २०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला. अवघ्या 25 वर्षांच्या वयात आमदार होत मैथिली ठाकूर बिहार विधानसभेच्या सर्वात तरुण आमदार ठरल्या.
विशेष म्हणजे ही त्यांची पहिलीच निवडणूक होती. गायिका म्हणून मोठी लोकप्रियता असलेल्या मैथिली ठाकूर यांनी भाजपच्या तिकिटावर अलीनगरमधून निवडणूक लढवली आणि RJD चे नेते विनोद मिश्रा यांचा 11,730 मतांनी पराभव केला.
विशेष बाब म्हणजे मैथिली ठाकूर या आता आमदार झाल्या असल्या तरी त्यांनी आपली गायिकी कायम ठेवली आहे. नाशिकच्या कुंभ भक्ती संगम कार्यक्रमात मैथिली ठाकूर यांचे सूर घुमणार आहेत. त्यामुळे नाशिकमधील त्यांची उपस्थिती केवळ सांस्कृतिक कार्यक्रमापुरती मर्यादित न राहता, राजकारण आणि लोकप्रिय संस्कृतीच्या संगमाचे उदाहरण म्हणूनही पाहता येते.
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित या तीन दिवसीय महोत्सवात भक्ती, संगीत आणि भारतीय सांस्कृतिक परंपरांचे दर्शन घडणार आहे. या महासोहळ्याचा दुसऱ्या दिवशी म्हणजे २९ ऑगस्टला भक्ती संमेलनाच्या दोन सत्रांनंतर डॉ. चारुदत्त आफळे यांचे कीर्तन आणि त्यानंतर रात्री ८ ते १० या वेळेत मैथिली ठाकूर यांचे भजन होणार आहे.
राजकीयदृष्ट्या पाहता, युवा मतदारांमध्ये लोकप्रिय असलेला चेहरा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि धार्मिक भावविश्व यांचा मेळ या कार्यक्रमातून साधला जात असल्याचे दिसते. मैथिली ठाकूर यांची गायिका म्हणून असलेली लोकप्रियता आणि आमदार म्हणून त्यांची नवी ओळख, कुंभाच्या सांस्कृतिक व्यासपीठाला वेगळे आकर्षण देऊ शकते. आमदारपदाची जबाबदारी सांभाळतानाच आपली कलात्मक ओळख जपणाऱ्या मैथिली ठाकूर यांची ही भूमिका राजकारणातील बदलत्या पिढीचेही प्रतिनिधित्व करते.
तीन दिवसांचा कुंभ भक्ती संगम
नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणातर्फे नाशिक शहरात आयोजित कुंभ भक्ती संगमात शुक्रवार २८ ऑगस्टपासून भक्ती, संगीत आणि विविध भारतीय सांस्कृतिक परंपरांचा अनोखा अनुभव घेता येणार आहे. ‘कुंभ भक्ती संगम’ या तीन दिवसीय महोत्सवाची तयारी पूर्ण झाली असून २८ ते ३० ऑगस्टदरम्यान ठक्कर डोम येथे हा महोत्सव होईल.
या महोत्सवाला प्रवेश विनामूल्य असून, तिकीट अथवा प्रवेशिका आवश्यक नसल्याने नाशिककर, भाविक, विद्यार्थी आणि सांस्कृतिक रसिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
या महोत्सवाचे २८ ऑगस्ट रोजी दुपारी साडेचार वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होईल. उद्घाटनानंतर सायंकाळी ५.३० ते ७ या वेळेत अमृताश्रम स्वामी महाराज यांचे कीर्तन होणार असून, रात्री ८ ते १० या वेळेत राहुल देशपांडे ‘अभंगवारी’ सादर करतील.
29 ऑगस्टला भक्ती संमेलनासह कीर्तन-भजन
२९ ऑगस्ट हा दिवस ‘भक्ती संमेलन’ आणि विविध भक्ति कार्यक्रमांच्या सादरीकरणांनी समृद्ध असेल. सकाळी १० ते १२ आणि दुपारी २ ते ४ या वेळेत दोन सत्रांमध्ये भक्ती संमेलन होईल.
पहिल्या सत्राचा विषय ‘सिंहस्थ महाकुंभमेळा : भारतीय संत आणि समरसता’ असून पराग महाराज चातुर्मासे हे सत्र समन्वयक असतील. या सत्रात शिवाजी महाराज मोरे, डॉ. वीरुपाक्ष शिवाचार्य महास्वामी, महंत श्रीमानस शास्त्री, सुदर्शन महाराज कपाटे, सुप्रिया साठे आणि प्रमोद महाराज जगताप सहभागी होतील.
दुसऱ्या सत्राचा विषय ‘सिंहस्थ महाकुंभमेळा : राष्ट्रीयदृष्ट्या संतपरंपरेचा सहभाग आणि समन्वय’ असून, डॉ. सदानंद मोरे हे सत्र समन्वयक असतील. श्री राणा महाराज वासकर, डॉ. द्वाराचार्य, महामंडलेश्वर रामकृष्णदास महाराज लहवितकर, जनार्दन हरिजी महाराज, रामकृष्ण महाराज वीर, मंदार बुवा रामदासी आणि महंत श्री. चिरडे बाबा यांचा या सत्रात सहभाग असेल.
भक्ती संमेलनानंतर सायंकाळी ५ ते ७ या वेळेत डॉ. चारुदत्त गोविंदस्वामी आफळे यांचे कीर्तन, तर रात्री ८ ते १० या वेळेत कु. मैथिली ठाकूर यांचा भजनाचा कार्यक्रम होईल.
गुरबाणीपासून मणिपूरच्या नट संकिर्तनापर्यंत
महोत्सवाच्या ३० ऑगस्टच्या अंतिम दिवशी देशाच्या विविध भागांतील भक्तिपरंपरांचा विशेष अनुभव घेता येणार आहे. दुपारी ३ ते ८ या वेळेत श्री दरबार साहिब, अमृतसर येथील भाई मनिंदर सिंह हजुरी रागी यांचे गुरबाणी शबद कीर्तन होईल. सायंकाळी ४ ते ५ या वेळेत मणिपूरच्या नट संकीर्तन महाजेग्याचे सादरीकरण होईल. सायंकाळी ५ ते ७ या वेळेत निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तनाने महोत्सवाची सांगता होईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.