
Nashik Kumbh Mela : नाशिकमध्ये दर १२ वर्षांनी कुंभमेळा भरतो. प्रयागराज येथील कुंभमेळ्यानंतर आता आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२६-२७ मध्ये नाशिक येथे होणार आहे. रविवार, १ जून रोजी यासंदर्भातील एक महत्त्वपूर्ण बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात येणार आहे. या बैठकीचे अध्यक्षस्थान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भूषवतील. या वेळी तेरा आखाड्यांचे प्रमुख साधू-संत, राज्य सरकारमधील महत्त्वाचे मंत्री, तसेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
या बैठकीत नाशिकमधील शाहीस्नानाच्या तारखा अधिकृतपणे जाहीर होणार आहे. नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळा भरणार असून त्र्यंबकेश्वर येथील तारखा यापूर्वीच जाहीर झाल्या आहेत. परंतु अद्याप नाशिकच्या तारखा जाहीर करण्यात आलेल्या नव्हत्या, त्यामुळे साधू-महंतांमध्ये नाराजी होती. हीच नाराजी दूर करण्यासाठी रविवारी बैठक होत आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात दुपारी १२ ते २ या वेळेत बैठक होणार आहे. मुख्यमंत्री फडणवीसांसह मंत्री छगन भुजबळ, दादा भुसे, माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवाळ आणि कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांचीही उपस्थितीती असणार आहे.
बैठकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने काटेकोर तयारी केली असून, मुख्यमंत्री व मान्यवर साधू-महंतांचे स्वागत, भोजन व वाहतूक यासारख्या सुविधा सुरळीत पार पडाव्यात यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. संपर्क व्यवस्थापनासह प्रत्येक घटकावर सखोल लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. यासाठी प्रशासनातील प्रत्येक अधिकाऱ्याला ठराविक जबाबदाऱ्या नेमून देण्यात आल्या आहेत, जेणेकरून संपूर्ण आयोजन विनाअडथळा पार पडेल.
मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आलेल्या निर्देशांनुसार, या बैठकीस केवळ निमंत्रितांनाच प्रवेश असेल. प्रत्येक आखाड्याचे दोन प्रतिनिधी-महंत तसेच नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील पुरोहित संघांचे प्रत्येकी एक प्रतिनिधी या महत्त्वपूर्ण चर्चेसाठी आमंत्रित करण्यात आले आहेत. प्रशासनातून विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हा पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आषिमा मित्तल यांच्यासह निवडक वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच बैठकीसाठी पाचारण करण्यात आले आहे.
या बैठकीच्या माध्यमातून नाशिकमधील कुंभमेळ्याच्या तयारीला अधिकृतपणे सुरुवात होणार आहे. बैठकीत मुख्य तीन शाही पर्वण्यांसह इतर लहान-मोठ्या स्नानदिनांच्या तारखा निश्चित केल्या जाणार आहेत. या बैठकीकडे नाशिकमधील तिन्ही आखाडे, खालसा प्रमुख तसेच हजारो भाविकांचे लक्ष लागून राहिले आहे. ही केवळ नियोजनाची बैठक नसून, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा भाविकांची आस्था, साधू-संतांच्या परंपरा आणि प्रशासनाच्या तयारीचा कस पाहणारी असेल. त्यामुळे या बैठकीत होणाऱ्या निर्णयांकडे संपूर्ण शहराचं आणि धार्मिक क्षेत्राचं लक्ष केंद्रित झालं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.