

Nashik Politics : नाशिक-त्र्यंबकेश्वर मध्ये सध्या सिंहस्थ कुंभमेळा कामांचे नियोजन व अमंलबजावणी जोरात आहे. त्यात कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन हेच सर्व बघत असून स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले जात नसल्याची खदखद आहे. त्याचे प्रतिबिंब मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या शिखर बैठकीत उमटल्याची चर्चा आहे. त्या बैठकीत ज्येष्ठमंत्री छगन भुजबळ यांनी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांना मुख्यमंत्र्यांसमोर जबाबदारीची जाणीव करून दिली आहे.
एवढेच नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अचानक भेट देऊन कुंभमेळा कामांची पाहणी करण्याची विनंती करून कुंभमेळा मंत्री त्यांच्या जबाबदारीचे पालन करीत नसल्याचे अप्रत्यक्षपणे दाखवण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे.
त्याचे झाले असे सिंहस्थ कुंभमेळा शिखर परिषदेची मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत बहुतांश लोकप्रतिनिधींनी त्यांच्या मतदार संघातील कामांचा आराखड्यात समावेश करण्याची मागणी केली. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांना यापूर्वी दोन सिंहस्थ कुंभमेळ्याचा अनुभव असल्याने त्यांनी सुरवातीला गोदावरी प्रदूषणमुक्त असणे, भाविकांची पायपीट कमी करणे याबाबत महत्वपूर्ण सूचना देत त्याबाबत उपाययोजना करण्याचा आग्रह धरला.
तसेच भुजबळांनी साधुग्राम ते रामकुंड या शाही मार्गाचा मुद्दा उपस्थित केला. हा मार्ग एका ठिकाणी उताराचा असल्याने तेथे चेंगराचेंगरी झाली होती. यामुळे प्रशासनाने शाहीमार्ग बदलण्याचा प्रस्ताव दिला. नवीन मार्ग स्मशानभूमी जवळून जात असल्याने आखाडे व साधुमहंत यांनी त्याला विरोध केला आहे. यामुळे पर्यायी मार्ग करण्याची गरज आहे. यासाठी कुंभमेळा मंत्री यांनी संबंधितांशी वेळीच बोलून त्यावर तोडगा शोधला पाहिजे. अन्यथा ऐनवेळी समस्या निर्माण होऊ शकते, ही बाब भुजबळांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या लक्षात आणून दिली.
यावेळी भुजबळ यांनी कुंभमेळा मंत्री यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिल्याचे बैठकीस उपस्थित असलेल्या सूत्रांचे म्हणणे आहे. एवढेच नाही तर सिंहस्थातील कामे दर्जेदार पद्धतीने व वेळेवर पूर्ण व्हावीत, याकडेही मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. यासाठी कुंभमेळ्याच्या कामांची पाहणी करण्यासाठी अचानक भेट द्या, अशी मुख्यमंत्री फडणवीस यांना विनंती केली. यातूनही त्यांनी येथे सारे काही आलबेल नसल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केल्याची उपस्थितांमध्ये चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.