

Nashik Kumbh Mela tender scam : कुंभमेळ्यातील बनावट वर्क ऑर्डरचं जळगाव कनेक्शन उघड झालं आहे. कुंभमेळ्यातील घोटाळ्याचं बिंग कसं फुटलं? याची इनसाईड स्टोरी आता समोर आली आहे. साम टीव्हीने यासंदर्भात सविस्तर वृत्त दिलं आहे. संशयितांनी बनावट वर्क ऑर्डर जळगावमधील आईसाहेब आर्ट प्रिंटिंग प्रेसमध्ये तयार करण्यात आल्याची माहिती तपासातून उघड झाली आहे.
सिंहस्थ कुंभमेळाच्या नावाखाली बनावट वर्कऑर्डरच्या माध्यमातून कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या भामट्यांच्या टोळीचे एकेक प्रताप आता उजेडात येत आहेत. या घोटाळ्यात संशयितांनी विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या बनावट सहीनं तब्बल 591 कोटींची काम दाखवून वर्क ऑर्डर काढली.
फिर्यादींचा विश्वास बसावा यासाठी नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालयात भेटण्यास बोलावलं. आयुक्तांच्या कार्यालयाच्या परिसरातच फिर्यादींना कामाच्या कंत्राटाची कागदपत्र दाखवल्याची बाब तपासातून समोर आली आहे.
भामट्यांनी फसवणुकीसाठी थेट भारत सरकारची राजमुद्रा, विभागीय आयुक्त कार्यालयाचे शासकीय चिन्ह आणि नाशिक महापालिकेच्या टेंडर नोटिशीचा गैरवापर केला. भारतीय राजमुद्रा असलेलं, आयुक्तांची सही असलेली टेंडरची कागदपत्रे दाखवली. टेंडरच्या मोबदल्यात एकुण रकमेच्या ८ टक्के आम्हाला आणि २ टक्के अधिकाऱ्यांसाठी आगाऊ रकमेची मागणी केली.
यातूनच तनय महाजनांच्या खात्यात २ कोटी ७२ लाख आल्याचा संशय आहे. तर नरेंद्र महाजन याने रोख स्वरुपात ३६ लाख ५० हजार घेतल्याचा आरोप आहे. तर, शकील शेखच्या बॅंक खात्यातही ८६ लाख ५० हजार रुपये असल्याची माहिती पुढे आली आहे. संशयितांनी पैशांच्या व्यवहारासाठी नातेवाईकांसह मित्रांच्या बॅंक खात्यांचा वापर केल्याचे उघड झाले आहे.
म्हणून बिंग फुटलं...
दरम्यान, टेंडरच्या अनुषंगाने व्यावसायिक भागीदारीची नोटरीही करण्यात आली. मात्र, संशयित आरोपींनी टेंडरचं अग्रीमेंट करण्यास टाळाटाळ केल्याने या घोटाळ्याचं बिंग फुटल्याचे तपासातून समोर आले आहे.
या प्रकरणात कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांचा जामनेरमधील नातेवाईक तनय अनंत महाजन याच्यासह आतापर्यंत सहा संशयितांना अटक करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हे सर्व संशयित जळगाव जिल्ह्यातील आहेत. नाशिकरोड पोलिस ठाण्यात याप्रकरणी आतापर्यंत पाच गुन्हे दाखल झाले आहेत.
आतापर्यंतचे अटकेतील संशयित
-तनय अनंत महाजन (वय ३२, रा. पाचोरा रोड, जामनेर, जि. जळगाव), नरेंद्र तोताराम महाजन (५१, रा. देशमुख गल्ली, जामनेर, जि. जळगाव), शोएब अहमद अब्दुल सत्तार शेख (३६, रा. गणेशवाडीरोड, मदनीनगर, जामनेर, जि. जळगाव), अब्दुल रईस अब्दुल मुनाफ शेख (४३, रा. जुना बोदवड रोड, चाळीस मोहल्ला, जामनेर, जि. जळगाव), शकील अहमद सलीमुद्दीन शेख (४२, रा. मदनेनगर, जामनेर, जि. जळगाव), मोहम्मद वसीम अब्दुल गफ्फार (४२, रा. इस्लामपुरा, जामनेर, जि. जळगाव).
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.