Nashik Lok Sabha : नाशिक लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटला आहे. महायुतीमधील ही जागा शिंदे गटाला सुटली आहे. याठिकाणी खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्याची अधिकृत घोषणा बुधवारी दुपारी करण्यात आली. त्यांची लढत ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे यांच्याशी होणार आहे.
नाशिक लोकसभा मतदारसंघाचा तिढा अखेर सुटला आहे. या ठिकाणी महायुतीचे उमेदवार ठरल्यानंतर गोडसे यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर फटके फोडून व पेढे वाटून आनंद व्यक्त करताना एकच जल्लोष केला. हेमंत गोडसे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
महायुतीमधील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्ष आणि उमेदवारीसाठी इच्छुक असलेले नेते गेल्या दोन महिन्यापासून प्रयनशील होते. ही झुंज नाशिक मतदारसंघाच्या वीस लाख मतदारांना अस्वस्थ करत होती. त्यापेक्षाही अधिक विद्यमान खासदार असूनही त्यांना वेटिंगवर ठेवण्यात आले होते. सुरुवातीला या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून छगन भुजबळ इच्छुक होते तर भाजपने दावेदारी केल्याने या मतदारसंघातील तिढा सुटत नव्हता.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून नाशिकमध्ये ओबीसी कार्ड खेळण्याचा भाजपचा प्रयत्न होता. यानिमित्ताने भुजबळ यांना उमेदवारी देण्याचे जवळपास निश्चित झाले होते. भुजबळ हे राज्यस्तरीय नेते असल्याने स्थानिक स्तरावर त्यांना विरोध अशक्य होता. मात्र, गेल्या 15 दिवसापूर्वी निवडणूक रिंगणातून माघार घेत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर हा तिढा जवळपास सुटला होता.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
हेमंत गोडसे हे नाशिकमधून चौथ्यांदा उमेदवारी करीत आहेत. पहिल्यांदा मनसे दुसऱ्यांदा भाजप शिवसेना युतीतर्फे ठाकरे गटाचे आणि यंदा शिंदे गटाचे उमेदवार म्हणून ते मतदारांना सामोरे जात आहेत. त्यांच्या समर्थकांनी उमेदवारी मिळाल्याने आनंद व्यक्त केला.
दरम्यान, नाशिकचा उमेदवार ठरविण्यासाठी कालपासून मोठ्या प्रमाणावर राजकीय घडामोडी होत होत्या. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी मंगळवारी भाजपच्या विविध पदाधिकाऱ्यांची चर्चा केली होती.
यावेळी बावनकुळे यांनी नाशिकच्या जागेवरील भारतीय जनता पक्षाचा दावा मागे घेत असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे महायुतीचा उमेदवार जाहीर होण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांनी त्यांची भेट घेतली. त्यानंतर बुधवारी दुपारी उमेदवार जाहीर करण्यात आला.