Nashik News: राज्यात लोकसभा निवडणुकीचा प्रचार शनिवारी सायंकाळी संपला. या प्रचारात राजकीय नेत्यांनी प्रतिस्पर्ध्यांवर व्यक्तिगत आणि खालच्या स्तरावर जाऊन टीका केली. या प्रचारामुळे अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांत तणाव आहे. या उलट नाशिकमध्ये राजकीय नेत्यांच्या प्रचारातील शालिनीतेमुळे येथील संयमी प्रचार राज्यभर नेत्यांसाठीही चर्चेचा विषय ठरला आहे.
नाशिक मतदारसंघात महायुतीने (Mahayuti) विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) आहेत. याशिवाय अध्यात्मिक क्षेत्रातील शांतिगिरी महाराज हे अपक्ष उमेदवार रिंगणात उतरले आहेत. वंचित बहुजन आघाडीचे करण गायकर, सिद्धेश्वरानंद आदींसह ३१ उमेदवार रिंगणात आहेत.
यातील प्रमुख उमेदवारांनी सोशल मीडिया, प्रत्यक्ष मतदारांमध्ये जाऊन गाठीभेटी, कार्यकर्त्यांचे मेळावे, जाहीर सभा, पत्रके आणि डिजिटल माध्यमांद्वारे प्रचार केला. नाशिकच्या प्रचाराला आजवर मराठा विरुद्ध ओबीसी असा रंग देण्याचा प्रयत्न होत आला आहे. यंदा राजाभाऊ वाजे यांनी मी सर्व समाजांचा प्रतिनिधी आहे, असे सांगून या वादाला बाजूला सारले.
वाजे यांच्या विरोधी उमेदवाराच्या काही व्हिडिओ क्लिप निवडणुकीआधी फिरत होत्या. निवडणुकीत या क्लिप बाबत उमेदवारांनी उल्लेख करणे टाळले. त्याचा प्रचारही केला नाही. हा संयम दाखवला नसता तर, नाशिक मतदारसंघाच्या सोशल मीडियावरील प्रचारात उमेदवारांचे अक्षरश: वस्त्रहरण झाले असते.
अध्यात्मिक क्षेत्रातील शांतिगिरी महाराज यांनी प्रचारात "निवडणूक लढणार आणि जिंकणार" अशी टॅगलाईन वापरली होती. राजकारणाचे शुद्धीकरण हे ध्येय घेऊन आपण निवडणुकीला उमेदवारी करीत आहोत. हिंदुत्ववादी संघटनांचा आपल्याला पाठिंबा असल्याचा त्यांचा दावा होता. त्यांच्या प्रचारासाठी राज्यभरातून भक्तगण आले होते. यातील कोणीही प्रतिस्पर्धी उमेदवाराविषयी नकारात्मक उल्लेख केला नाही. हे उमेदवार प्रामुख्याने आपली स्वतःची प्रतिमा आणि काय कामे करणार हे सांगत राहिले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
विद्यमान खासदार गोडसे यांनी सर्व माध्यमांचा उपयोग करून प्रचार केला. त्यांच्या प्रचारात प्रामुख्याने दहा वर्षातील विकास कामे आणि भविष्यातील योजना यावर भर दिला. वाजे यांनी नागरी प्रश्न, सार्वजनिक आरोग्य, शेतकरी, युवक आणि महिलांचे प्रश्न याला प्राधान्य दिले होते. त्यामुळे प्रचाराचा स्तर टिकला.
कोणत्याही उमेदवारांनी एकमेकांचे कपडे फाडण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे मतदारांमध्ये एक चांगला संदेश गेला. राज्यातील अन्य मतदार संघांमध्ये अतिशय टोकाचा वाद, आरोप, व्यक्तिगत नालस्ती, पैसे वाटप असे अनेक गैरप्रकार घडत होते. त्या तुलनेत नाशिकचा संयमी प्रचार राज्यभर नेत्यांसाठीही चर्चेचा विषय ठरला.
(Edited by : Sachin Waghmare)