

Nashik MLC Election : विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक संपूर्ण राज्यभरात गाजली. अगदी मतदानाच्या दिवशीही या निवडणुकीत नाट्यमय घडामोडी घडल्याने ही निवडणूक चर्चेच्या केंद्रस्थानी राहिली.
या निवडणुकीत मतदार नगरसेवकांना मोठ्या स्वरुपात लक्ष्मी दर्शन घडल्याने त्यांची चांगलीच चंगळ झाली. माघारीनंतर सुरुवातीला रिंगणातील एकाच उमेदवाराकडून लक्ष्मी दर्शन घडणार यातून मतदार नाराज होते.
मात्र, प्रत्यक्षात निवडणूक रिंगणातील दोन्ही उमेदवारांकडून मताचे दान पदरात पाडून घेण्यासाठी भरभरून दान मिळाल्याने मतदारांमध्ये भलताच उत्साह संचारल्याचे पाहायला मिळाले. या निवडणुकीत तब्बल 70 ते 80 कोटी रुपयांचा चुराडा झाल्याची चर्चा शहरात रंगली आहे.
या निवडणुकीत दगाफटका टाळण्यासाठी रिसॉर्ट पॉलिटिक्सचा अवलंब करण्यात आला. महायुतीच्या मतदारांना ठाण्यातील एका रिसॉर्टमध्ये हलवण्यात आलं होतं. तिथे चार दिवस मतदारांची चांगली खातीरदारी करण्यात आल्याची चर्चा आहे. मतदानाच्या दिवशी सकाळी नाराज मतदारांची पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून नाराजी दूर करण्यात आल्याची चर्चा आहे.
नगरसेवक मतदारांना दोन्ही उमेदवारांकडून लक्ष्मी दर्शन झाल्याने ते खूश झाल्याचे पाहायला मिळाले. ज्या उमेदवाराकडून मोठे पाकिट मिळाले, त्याला 'पहिल्या पसंतीचे' मत आणि ज्याच्याकडून छोटे पाकिट मिळाले, त्याच्या पारड्यात 'दुसऱ्या पसंतीचे' मत टाकल्याची चर्चा मतदानाच्या दिवशी रंगली होती. एका मताला एका बाजुने आठ लाखांचा तर दुसऱ्या बाजूने सात लाखांचा भाव फुटल्याची चर्चा होती.
दोन्ही बाजूंनी झालेल्या या धनवर्षावामुळे महायुतीमधील मतांचे विभाजन झाल्याचे बोलले जात आहे. त्यातूनच नाशिकमध्ये अनपेक्षित निकालाच्या चर्चा रंगल्या आहेत.
अपक्ष उमेदवार गोकुळ गिते व प्रसाद हिरे यांनी निवडणुकीतून माघार घेतली होती. मात्र, माघार घेताना गोकुळ गिते यांनी महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना जाहीर पाठिंबा जाहीर केला नाही. त्यामुळे महायुतीमधील हा समेट तात्पुरता असल्याचे बोलले जात होते. शेवटपर्यंत महायुतीच्या नेत्यांना धाकधूक होती. कारण तांत्रिक दृष्ट्या माघारीची वेळ निघून गेल्याने गिते व हिरे दोघांचे नाव मतपत्रिकेवर कायम होते. त्यामुळे माघारीनंतरही या निवडणुकीची रंगत कायम राहिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.