
Sangamner Politics : नाशिक पदवीधरचे आमदार सत्यजीत तांबे संगमनेरसाठी चांगलेच आक्रमक झाले आहे. शिवसेनेचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापाठोपाठ भाजपमधील दिग्गज मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची देखील भेट घेतली.
आमदार तांबे यांच्या या झंझावातावरून 'ज्यांनी समजायचं त्यांनी समजून घ्या', अशी चर्चा संगमनेरमधील थोरात-तांबे समर्थकांमध्ये रंगल्या आहेत.
मुंबई इथं शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची आमदार सत्यजीत तांबे यांनी भेट घेऊन अभय योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी IWBP (Integrated Web-Based Portal) प्रणालीतील त्रुटी तातडीने दूर करण्याची मागणी केली.
WBP प्रणालीमध्ये एकरकमी समायोजनेची सुविधा नाही, त्यामुळे प्रत्येक थकबाकीदारासाठी अनेक नोंदी कराव्या लागतात. एका लाभार्थ्याच्या सरासरी 7-8 नोंदी कराव्या लागतात, ज्यासाठी अंदाजे दीड तास लागतो. लाभार्थ्याने बिल भरण्यास नकार दिल्यास नोंदी पूर्ववत करणे शक्य नाही. अधिकाऱ्यांना नोंदी तपासण्याची सोय नाही, त्यामुळे चूक सुधारता येत नाही.
नगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायत क्षेत्रातील थकित मालमत्ता करावरील शास्ती माफ करून, कर वसुलीसाठी राबविण्यात येणाऱ्या प्रोत्साहनात्मक अभय योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी IWBP प्रणालीतील या त्रुटी दूर करणे अत्यावश्यक आहे, याकडे आमदार तांबे यांनी उपमुख्यमंत्री शिंदेंचं लक्ष वेधलं. या त्रुटींमुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री शिंदेंनी लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं.
भाजपचे (BJP) महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली 30 जुलैला संगमनेर शहरातील इंदिरानगर भागातील सर्वे नंबर 106 (442) इथल्या नागरिकांना मालकी हक्क मिळवून देण्यासाठी, महसूल अभिलेखातील पोकळीस्त आणि अन्य हक्कांच्या नोंदी रद्द करून प्रत्यक्ष रहिवाशांच्या नावावर 7/12 व सिटी सर्वे अभिलेख करण्यासंदर्भात बैठक पार पडली होती. याचा संदर्भ घेऊन सत्यजीत तांबे यांनी मंत्री बावनकुळे यांची पुन्हा भेट घेतली.
संगमनेर बुद्रुक इथल्या सर्वे नंबर 106 (442) प्रमाणेच सर्वे नंबर 104, 105 व 219 मधील पोकळी स्थळ आणि इतर हक्कांच्या नोंदी रद्द करावी, प्रत्यक्ष वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांच्या नावावर नोंद करण्याचा आदेश अहिल्यानगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात यावेत, अशी मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी महसूलमंत्री बावनकुळे यांना भेटून पुन्हा केली. सत्यजीत तांबे यांच्या पाठपुराव्याची दखल घेऊन मंत्री बावनकुळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना पुढील कार्यवाहीसाठी आवश्यक निर्देश दिले.
या मोठ्या नेत्यांच्या गाठीभेटीबरोबर आमदार सत्यजीत तांबे यांनी सुरू केलेल्या कामाचा धडाका सत्ताधारी आणि विरोधक आमदारांच्या नजरेतून सुटलेला नाही. संगमनेरमध्ये थोरात-तांबे समर्थकांमध्ये आमदार तांबेंच्या या कार्यपद्धतीची जोरदार चर्चा रंगली आहे. आमदार तांबे यांची कार्यपद्धतीने पाहून ज्यांनी काय समजायचं, ते समजवून घ्यावं, अशी सूचक प्रतिक्रिया समर्थक व्यक्त करत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.