
Nashik News : नाशिकमध्ये तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गोवर्धन गावात दोन दिवसांपूर्वी ग्रामसभा बोलविण्यात आली होती. मात्र, यावेळी व्हिडिओ शूटिंग काढण्यावरून सरपंच आणि तंटामुक्ती अध्यक्ष यांच्यात वाद उफाळून आला. या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. दोन्ही बाजूंच्या गटांमधील महिला-पुरुषांमध्ये हाणामारी झाली. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. याप्रकरणी सरपंच, तंटामुक्ती अध्यक्षासह दहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
घटनेची माहिती मिळताच पेठ 3 विभागाचे पोलिस घटनास्थळी पोहचले. त्यानंतर याठिकाणी निर्माण झालेल्या परिस्थितीवर पोलिसांनी नियंत्रण मिळवलं. या घटनेप्रकरणी गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल केलेल्या गुन्ह्यांमध्ये अॅट्रॉसिटी, बेकायदेशीरपणे जमाव जमवून दंगल घडविणे, जिवे मारण्याचा प्रयत्न करणे, विनयभंग यांसारखे गंभीर कलमांखाली गुन्हे नाशिक तालुका पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आले आहे. या गावातील दोन्ही गटांमध्ये याआधीही काही प्रमाणात संघर्ष होता. त्याच संघर्षातून त्या दिवशी हा राडा झाल्याचे समोर आले आहे.
फिर्यादीत दिलेल्या माहितीनुसार, गावातील बिरसा मुंडा सभागृहात ग्रामसभा बोलविण्यात आली होती. सकाळी 11 वाजेच्या सुमारास फिर्यादी सरपंच गोविंद दत्तू डंबाळे हे सभेच्या ठिकाणी बसलेले होते. यावेळी संशयित आरोपी किशोर पिराजी जाधव, शंकर पाटील, बाळासाहेब पाटील, अनिल जाधव, शंकर ढवळे, सुनील जाधव व त्यांच्यासोबत असलेल्या दोन महिलांनी कुरापत काढून ग्रामसभेत मारहाण करण्याचा कट रचत लाठ्याकाठ्यांनी हल्ला करत मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी साक्षीदार महिलेच्या अंगावरील कपडे फाटले. सार्वजनिक ठिकाणी लज्जास्पद कृत्य केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. (Nashik News)
पोलिसांनी फिर्यादीच्या तक्रारीवरून संबंधित संशयितांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष असलेल्या संशयित किशोर जाधव यांच्या तक्रारीनुसार सरपंच गोविंद डंबाळे, विशाल जाधव, पोपट डंबाळे, हरी डंबाळे, हेमंत डंबाळे, फकिरा डंबाळे, सोमनाथ सननाईक, अक्षय डंबाळे, दिनेश पाटील यांच्यासह काही महिलांविरुद्ध अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत तसेच जीव घेण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपांवरून गुन्हा दाखल झाला आहे.
तक्रारीनुसार, फिर्यादी व त्यांच्यासोबतच्या महिला साक्षीदार ग्रामसभेला उपस्थित होत्या. त्या वेळी त्यांच्याकडून मोबाईलने व्हिडिओ रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न होत असताना संशयितांनी त्याला आक्षेप घेत अडवले. याच दरम्यान डंबाळे यांनी साक्षीदार महिलांशी गैरवर्तन केल्याचा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे. या दोन्ही प्रकरणांचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.