Nashik News, 28 Oct : आरपीआय नेता आणि माजी नगरसेवक प्रकाश लोंढे याला मोठा धक्का बसला आहे. गेले काही दिवस लोंढे आणि मुलगा दीपक अटकेत आहे. आता त्यांच्यावर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. सातपूर परिसरातील ऑरा बार आणि रेस्टॉरंटच्या मालकावर 5 सप्टेंबरला हल्ला झाला होता.
खंडणीसाठी गोळीबार करण्यात आला. या प्रकरणात RPI पक्षाचे माजी नगरसेवक प्रकाश लोंढे याला मुलासह अटक झाली होती. या गुन्ह्याच्या तपासात पोलिसांना अत्यंत धक्कादायक माहिती मिळाली. प्रकाश लोंढे आणि त्यांची दोन्ही मुले भूषण व दीपक हे संघटित गुन्हेगारी व टोळी चालवत होते. त्यातून खंडणीचे मोठे रॅकेट उघड झाले.
नाशिककरांसाठी ते धक्कादायक होते. माजी नगरसेवक प्रकाश लोंढे हा आरपीआयचा उत्तर महाराष्ट्र प्रमुख आहे. त्याचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याशी घनिष्ठ संबंध आहेत. त्यामुळे या राजकीय पदाचा उपयोग करून तो पोलीस यंत्रणेला वेठीस धरत होता.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक शहरातील राजकीय नेत्यांची गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी निर्णय घेतला. याबाबत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना कारवाईचे आदेश दिले होते. महिन्याभरात पोलिसांनी केलेल्या कारवाईने राजकीय नेत्यांची झोप उडाली. अनेक नेते शहर सोडून परागंदा झाले आहेत.
सोमवारी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी मोठा निर्णय घेतला. माजी नगरसेवक लोंढे, टोळी चालवणारा त्याचा मुलगा भूषण लोंढे आणि दीपक लोंढे यांसह टोळीविरुद्ध 'मोक्का'ची कारवाई करण्यात आली. गुन्हेगारांना सुधारण्याची संधी देण्यात आली. मात्र ते गुन्हे करण्यापासून परावृत्त झाले नाहीत. त्यामुळे ठोस कारवाई करणे भाग होते, असे पोलीस आयुक्त कर्णिक म्हणाले.
प्रकाश लोंढे उर्फ बॉस याच्या टोळीतील भुऱ्या उर्फ राजू पाटील, दुर्गेश संतोष वाघमारे, आकाश उर्फ अभिजीत राजू अडांगळे, मुलगा दीपक प्रकाश लोंढे, संतोष शेट्टी पवार उर्फ जल्लाद, अमोल बाबासाहेब पगारे, देवेश गजानन शेरताटे, ओशुभम रामगीर गोसावी, ललित विठ्ठलकर उर्फ सनी, भूषण प्रकाश लोंढे, प्रिन्स चित्रसेन सिंग, शुभम चंद्रकांत निकम, वेदांत संजय चाळगे, राहुल सत्यविजय गायकवाड, निखिल निकुंभ आणि संदीप रमेश गांगुर्डे यांच्या विरोधात मोकाची कारवाई झाली आहे. यातील भूषण लोंढे फरारी आहे.
माजी नगरसेवक लोंढे यांच्यावर कारवाई झाल्याने त्याची कारागृहातून सुटका करणे अवघड आहे. गेली काही वर्ष आरपीआयच्या संघटनेवर त्याचे एक हाती वर्चस्व होते. अन्य कोणालाही पक्षात संधी नव्हती. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आरपीआयला हा मोठा राजकीय धक्का आहे
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.