

Nashik saints and Akhada leadership updates: नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आखाडा परिषदेत महत्त्वाचे फेरबदल झाले आहेत. १३ पैकी आठ आखाडे एकत्र आले आहेत. त्यांनी हरिद्वार येथे आपले पदाधिकारी घोषित केले आहेत. हरिद्वार येथे दोन दिवसांपूर्वी विविध आखाडे एकत्र आले. यामध्ये तेरा पैकी आठ आखाड्यांचे एकमत झाले. त्यांनी कुंभमेळ्यासाठी गोदावरी स्वच्छतेचा संकल्प सोडला व नवीन पदाधिकारी जाहीर केले.
अखिल भारतीय आखाडा परिषदेच्या अध्यक्षपदी महंत रवींद्र पुरी महाराज, उपाध्यक्षपदी दुर्गादास महाराज, महामंत्रीपदी महंत राजेंद्र प्रसाद आणि राजेंद्रदास, सहसंयोजकपदी महंत शंकरदास महाराज, मंत्रीपदी वैष्णवदास महाराज तर राष्ट्रीय प्रवक्तेपदी महंत ज्ञानदास महाराज यांचे उत्तराधिकारी महंत संजयदास यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आखाडा परिषदेच्या लेखाधिकारीपदी सत्यमगिरी महाराज, माध्यम संयोजक पदी महामंडलेश्वर करौली शंकर महाराज, संरक्षक म्हणून भगतराम महाराज, ज्ञानदेवसिंह आणि मुरलीदास महाराज यांची नियुक्ती झाली.
हरिद्वार येथे झालेल्या बैठकीच्या निमित्ताने महानिर्वाणी आखाडा, बडा उदासीन, अटल आखाडा आणि त्यांच्याशी संलग्न उप आखाडे तसेच वैष्णव पंथाचे निर्वाणी आणि निर्मोही असे आठ आखाडे एकत्र आले. वैष्णव पंथाच्या दिगंबर, जुना आखाडा, शैव पंथाचे निरांजनी, आवाहन, महानिर्वाणी आणि अटल हे पाच आखाडे स्वतंत्र झाले. यातील दिगंबर आखाड्याने यापूर्वीच प्रशासनाला स्वतंत्र पत्र दिले आहे.
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्यात वैष्णव आखाड्यांत मतभेद झाले होते. त्यानंतर प्रयागराज येथे आखाडा परिषदेच्या अध्यक्षपदी नरेंद्रगिरी महाराज यांची नियुक्ती झाली होती. नरेंद्रगिरी महाराज ब्रह्मलीन झाल्यानंतर आखाड्यांमध्ये अध्यक्षपदावरून मतभेद झाल्याने दोन गट पडले होते. एका गटाने महानिर्वाणी आखाड्याचे रवींद्र पुरी तर दुसऱ्या गटाने निरंजनी आखाड्याचे महंत रवींद्र पुरी यांना अध्यक्ष नियुक्त केले होते.
हरिद्वार येथे झालेल्या बैठकीच्या निमित्ताने अखिल भारतीय आखाडा परिषदेत पुन्हा एकदा मतभेद स्पष्ट झाले आहेत. तेरापैकी आठ आखाडे एकत्र आले आहेत. पाच आखाड्यांनी स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे. साधू आणि आखाड्यातील या राजकारणामुळे प्रशासनापुढे कुंभमेळ्याचे नियोजन करताना अडचणी निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.