

Nashik News : नाशिकच्या सिन्नर तालुक्यात आता सध्या चर्चा आहे, ती रवींद्र भाबड या तरुणाची... महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) राज्यसेवा परीक्षेचा 2024 चा निकाल नुकताच जाहीर झाला. रवींद्रने या परिक्षेत राज्यात तृतीय क्रमांक पटकावत उपजिल्हाधिकारी पदाला गवसणी घातली आहे. त्यांच्या या यशाचं नाशिकसह राज्यभरात कौतुक होत आहे.
या निकालाने रवींद्र यांच्या संघर्षाची कहाणी समोर आली आहे. त्यांचा इतपर्यंतचा प्रवास इतका सोपा नव्हता. रवींद्र भाबड यांनी सुरुवातीला पोलीस भरतीची तयारी केली होती. पण दहा मार्कांनी पोलीस होण्याची संधी हुकलेल्या रवींद्र यांनी त्यानंतर पोलिस भरतीकडे न वळता खडतर MPSC चा मार्ग निवडला आणि आज ते यशस्वी झाले आहेत. त्यांचा हा खडतर प्रवास अनेकांना प्रेरणा देणारा ठरणार आहे.
रवींद्र भाबड यांचा शैक्षणिक प्रवास नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यामधील त्याच्या चास या गावापासून सुरु झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण तिथे झाले. त्यानंतर माध्यमिक शिक्षण भोजापूर खुरे हायस्कूलमध्ये झाले. उच्च शिक्षण डी कॉलेजमध्ये घेतल्यानंतर त्यांनी कला शाखेतून स्पर्धा परीक्षेकडे वळण्याचा निर्णय घेतला. परिस्थिती बेताची असल्यामुळे आई-वडिलांनी मोलमजुरी करून त्यांचे आणि दोन्ही बहिणींचे शिक्षण पूर्ण केले.
८ शब्दांचा सक्सेस मंत्र
घरच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव त्यांना होती. कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यावर त्यांना शिक्षणाचा खर्च भागवणे कठीण झालं. म्हणून रवींद्र यांनी पार्ट टाइम काम करायला सुरु केली, काहीवेळेला मित्रांची मदत घेतली आणि पुढे वाटचाल सुरु ठेवली. भाबड म्हणतात, माझी गरीब परिस्थिती हेच माझे खरे बळ आहे. यशस्वी होण्यासाठी परिस्थिती बदलायची नसते, दृष्टिकोन बदलायचा असतो. हाच त्यांचा ८ शब्दांचा सक्सेस मंत्र ठरला.
२०१४ च्या पोलीस भरतीत त्यांचे सिलेक्शन फक्त दहा मार्कांनी हुकले होते. त्यावर ते सांगतात कदाचित पुढे प्रयत्न केले असते तर एखाद्या वर्षात पोलीस भरतीत यश मिळवून मी पोलीस शिपाई झालो असतो, चांगली नोकरी मिळाली असती आणि लवकर लग्न करून सेटलही होता आले असते. पण तो सोपा मार्ग न निवडता मी जाणीवपूर्वक एमपीएससीचा खडतर मार्ग निवडला.
आधी नाशिक नंतर गाठले पुणे
पहिले वर्ष त्यांनी नाशिकमध्ये परीक्षेची तयारी केली, मात्र स्पर्धा परीक्षेचे खरे वातावरण पुण्यात असल्याने त्यांनी पुण्याला जाण्याचा निर्णय घेतला आणि पुढील तीन-चार वर्षे कठोर मेहनत घेतली. २०१९ मध्ये स्पर्धा परीक्षांमधूनच नायब तहसीलदार म्हणून निवड झाली. कोरानामुळे २०२२ ला पोस्टिंग मिळाली. मात्र उपजिल्हाधिकारी व्हायचे स्वप्न त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. नोकरी सांभाळून पुढच्या परीक्षेची तयारी केली. एप्रिल २०२५ मध्ये गटविकास अधिकारी म्हणून निवड होऊन सध्या कल्याण येथे परीक्षाधीन गटविकास अधिकारी म्हणून ते कार्यरत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.