

Nashik Crime News : नाशिकच्या सिडको परिसरात पाच दिवसांपूर्वी एक धक्कादायक घटना घडली. महापालिकेच्या लसीकरण शिबिरातून लस घेऊन बाहेर पडल्यानंतर अवघ्या काही अंतरावर गेले असता एक 16 वर्षीय मुलगी चक्कर येऊन खाली कोसळली. तिला रुग्णालयात दाखल केले असता तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितलं. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती.
श्रावणी अनिल पाटील असे मृत झालेल्या मुलीचे नाव आहे. श्रावणीने नाशिक शहरातील कामटवाडे भागात महापालिकेच्या लसीकरण शिबिरात 'धनुर्वात आणि घटसर्प' लशीचा बूस्टर डोस घेतला.
लस घेऊन ती जवळ असलेल्या एका मेडिकल दुकानात गेली अन् तिथेच काही मिनिटात ती चक्कर येऊन खाली पडली व तिचा मृत्यू झाला. लसीकरणामुळेच तिचा मृत्यू झाल्याचा आरोप मृत श्रावणीच्या कुटुंबियांनी केला होता. दरम्यान आता या मुलीच्या मृत्यूनंतर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
नाशिकमधील या घटनेनंतर, राज्य सरकारने डिप्थीरिया आणि टिटानस या औषधांच्या ठराविक बॅचवर आता संपूर्ण राज्यात तातडीने बंदी घातली आहे. राज्यातील सर्व शासकीय आरोग्य केंद्रे आणि दवाखान्यांना ही लस न वापरण्याबाबत कडक सूचना देण्यात आल्या आहेत.
राज्यभरात या विशिष्ट बॅचच्या एकुण १,६३२ लस बाटल्या वितरित करण्यात आल्या होत्या. त्यापैकी १,३६० बाटल्या वेगवेगळ्या केंद्रांवर या घटनेआधीच वापरण्यात आल्या. मात्र, नाशिकमध्ये घडलेल्या मुलीच्या मृत्यूच्या गंभीर घटनेनंतर उर्वरित २७२ बाटल्या तत्काळ परत मागवण्यात आल्या आहेत. तसेच लस देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विशिष्ट सिरिंज व इंजेक्शनच्या एकुण १ लाख ३७ हजार ६०० इंजेक्शन वितरित झाली. त्यापैकी १ लाख ११ हजार २०० इंजेक्शनचा वापर झाला आहे.
दरम्यान , श्रावणीला ज्या बाटलीतून डोस देण्यात आला, त्याच बाटलीतून अन्य पाच जणांनाही डोस देण्यात आला होता. मात्र, त्या पाचही जणांवर कोणताही विपरीत परिणाम झालेला नाही. त्यामुळे मृत्यूचे नेमके कारण शोधण्यात येणार आहे. या संपूर्ण प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी आणि तपासणीसाठी लस आणि इंजेक्शन या दोन्ही घटकांचे सुमारे ८०० नमुने केंद्रीय औषध प्रयोगशाळा, कसौली (हिमाचल प्रदेश) येथे पाठवण्यात आले आहेत.
लस व सिरिंजच्या वापरला स्थगिती
नाशिकमध्ये घडलेली घटना दुर्देवी असून, औषध प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित लस आणि सिरिंजच्या वापराला संपूर्ण राज्यात स्थगिती देण्यात आली आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतरच पुढील कारवाई निश्चित केली जाईल, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन सहआयुक्त ए. टी. बर्डे यांनी दिली आहे.
तीव्र अॅलर्जिक प्रतिक्रियेमुळे मृत्यू
दरम्यान, नाशिक महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने श्रावणी पाटील हिचा मृत्यू तीव्र अॅलर्जिक प्रतिक्रियेमुळे झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढला आहे.
धनुर्वात आणि घटसर्प प्रतिबंधक लशीनंतर श्रावणीचा मृत्यू झाला किंवा कसे याचे सविस्तर कारण शोधण्यासाठी मृत मुलीच्या त्वचेचे, रक्ताचे नमुने, तसेच व्हिसेरा नाशिक व छत्रपती संभाजीनगर येथील फॉरेन्सिक लॅबकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.